रोहिणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम
भारताची जगविख्यात बॅडमिंटनपटू ऑलिम्पिक कांस्य विजेती सायना नेहवालला आपण सर्वच ओळखतो. पण यावेळी तिच्या नावाची चर्चा नसून चर्चा रंगली आहे ती, मालविका बनसोडची. मालविका बनसोड आहे तरी कोण? नागपूरची युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत फक्त ३४ मिनिटांत सरळ गेममध्ये सायना नेहवालचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. आपल्या या विजयाने लोकांनसमोर २० वर्षांच्या मालविकाने मोठे उदाहरण मांडले आहे. इच्छाशक्ती, ध्येय आणि चिकाटी प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते हे तिने दाखवून दिले आहे.
आपल्या या विजयानंतर मालविका म्हणाली की, “मला विश्वासच होत नाही की, मी सायनाला हरविले आहे. हा माझ्यासाठी एक उत्तम अनुभव ठरला. माझ्या या विजयामुळे मी फारच आनंदी आहे. सायनाला मी माझी आदर्श खेळाडू मानते. सायना खूप वर्षांपासून भारतीय बॅडमिंटनचे नेतृत्व करीत होती. मी तिलाच खेळताना पाहून माझ्या करिअरची सुरुवात केली. माझ्या खेळावर खरे तर सायनाचा फारच प्रभाव आहे. सायनाच्या खेळाची शैली मला आवडते. त्यामुळे मला तिचा खेळ आवडतो.” असे ती म्हणाली.
मालविकाला याआधीही २०१८ मध्ये विश्व ज्यनियर बॅडमिन्टन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवडण्यात आले आहे. अखिल भारतीय वरिष्ठ गट रँकिंग स्पर्धा २०१९ मध्ये ही तिने विजय मिळवला आहे. मालविकाने काठमांडूमध्ये दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतही विजय मिळवला आहे. सध्या हैदराबादमध्ये वरिष्ठ रँकिंग स्पर्धेचं विजेतेपद मिळवले. मालविका ही वयाच्या ८व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळत आहे. तिचे कोच संजय मिश्रा हे तिला रायपूरमध्ये प्रशिक्षण देतात. मालविका ही नागपूरची रहिवासी आहे तिचा जन्म १५ सप्टेंबर २००१ मध्ये झाला. अवघ्या २०व्या वर्षात तिने ही कौतुकास्पद कामगिरी केली त्यामुळे सर्वांनाच ही प्रेरणा देणारी घटना घडली आहे.