मुक्तपीठ टीम
आयटीआरचा अर्थ इनकम टॅक्स रिर्टन असा आहे. हे फाईल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. आयटीआर नेहमी आर्थिक वर्ष म्हणजेच ‘१ एप्रिल ते ३१ मार्च’ या कालावधीसाठीच भरला जातो. २०२१-२२ या आर्थिक वर्षात आयकर रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलैच्या अंतिम मुदतीत आयकर विभागाने कोणताही बदल केलेला नाही. आयकर पोर्टलबाबत सोशल मीडियावर तक्रारी करूनही विभागाने मुदतवाढ दिली नाही.
अशा परिस्थितीत ज्यांनी १ ऑगस्टपर्यंत आयकर रिटर्न भरले नाहीत, त्यांचे काय होणार? आयकर विभाग त्यांच्यावर कोणती कारवाई करणार किंवा त्यांना कर भरण्याची संधी दिली जाणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
- सरकारच्या नियमांनुसार, जे करदाते ३१ जुलैपर्यंत रिटर्न भरू शकले नाहीत, त्यांना आयकर भरण्याची संधी आहे. ३१ डिसेंबरपर्यंत लोक आयकर भरू शकतात.
- मुदत संपल्यानंतर लोकांना त्यासाठी दंड भरावा लागणार आहे.
- १९६१ च्या आयकर कायद्यानुसार, ३१ जुलैनंतर कर भरणाऱ्यांना कलम २३४ए अंतर्गत व्याजासह आयकर भरावा लागेल.
३१ जुलैनंतर आयकर भरणाऱ्यांना किती दंड भरावा लागणार
- ३१ जुलैनंतर कर भरणाऱ्यांना दंडासह रिटर्न भरण्याची संधी मिळेल.
- वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी दंडाची रक्कम वेगवेगळी असेल.
- ज्यांचे वार्षिक वेतन ५ लाखांपर्यंत आहे ते ३१ डिसेंबरपर्यंत १ हजार रुपयांच्या दंडासह रिटर्न भरू शकतात.
- ज्यांचे वार्षिक वेतन ५ लाखांपेक्षा जास्त आहे ते ५ हजार रुपयांच्या दंडासह रिटर्न भरू शकतात.
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न सवलत मर्यादेपेक्षा कमी आहे त्यांना कर विवरणपत्र भरण्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.
३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न नाही भरल्यास काय होईल?
जर करदात्यांनी ३१ डिसेंबरची आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत चुकवली, तर त्यांना त्यांच्या प्रभागातील आयकर आयुक्तांसमोर माफीसाठी अपील दाखल करावे लागेल. त्यानंतरच त्यांना परतावा किंवा नुकसान कॅरी फॉरवर्ड करण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी विभागाने ‘आयटीआर यू’ फॉर्म आणला आहे, ज्यामध्ये ग्राहक अपडेटसह रिटर्न दाखल करू शकतात. यामध्ये त्याला उत्पन्नावरील आयटीआर उशिरा जमा करण्याचे कारणही स्पष्ट करावे लागणार आहे.