हुसैन दलवाई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हुसैन दलवाई यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना एक खुले पत्र लिहिले आहे. दलवाई दाम्पत्यांने नुकतीच कोरोनाशी झुंज दिली. त्यानंतर त्यांच्या चालकांवरील कोरोना उपचारादरम्यान त्यांना मुंबई मनपाच्या बीकेसी कोरोना उपचार केंद्रात आलेले वाईट अनुभव त्यांनी उघड केले आहेत. डॉक्टर, नर्स आणि इतर सर्वच आरोग्य रक्षकांच्या मानधनात कपातीच्या निर्णयाचा विपरीत परिणाम होत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य रक्षकांचे पगार कमी करणे ही काटकसर कोरोना संकटातून बाहेर येताना निभाऊन नेता येणार नाही, असेही त्यांनी बजावले आहे.
खरंतर दलवाई यांनी पत्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उद्देशून लिहिले असले करी बीकेसी कोरोना उपचार केंद्र हे मुंबई मनपाशी संबंधित असल्याने त्यांच्या पत्राची महापौर किशोरी पेडणेकर यांनीही दखल घेणे आवश्यक आहे.
माजी खासदार हुसैन दलवाई यांचे पत्र जसे आहे तसे:
श्री राजेश टोपे जी,
आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई,
दि.02/04/2021
विषय : कोरोना व्हायरस ट्रीटमेंट संबंधात मला आलेला वाईट अनुभव, सुधारणा करण्यासाठी आपल्या बरोबर शेअर करीत आहे
मी
मा. खा. हुसेन दलवाई, आणि माझी पत्नी शमा दलवाई, दोघे ही कोरोना व्हायरसने आजारी आहोत. ट्रीटमेंट घेऊन आम्ही घरी आलो आहोत. माझे दोन्ही ड्रायवर 1) नेत्रराम निषाद वय 37, कोरोना वायरस ने आजारी BKC सेंटर मध्ये दाखल बेड नंबर C 27.2) संतोष यादव, बेड क्र C 21 BKC कोरोना व्हायरस ने आजारी. या दोघांना पॉझिटिव्ह आल्या नंतर होम कोरंटाईन केल होत डॉ च्या सल्ल्याने. एक आठवड्या नंतर त्यांना त्रास होऊ लागला म्हणून H/East वॉर्ड मधील वॉर रूम मध्ये संपर्क करून त्यांना हॉस्पिटल किंवा सेंटर मध्ये शिफ्ट करण्यासाठी विनंती केली.
त्या विनंती नंतर 3 तासांनी अॅम्ब्युलन्स आली त्यांना BKC कोरोना सेंटर मध्ये सोडण्यासाठी. त्यांना तिथे 3 तास ताटकळत उभे ठेवण्यात आले. तक्रार केल्या नंतर त्यांना सेंटर मध्ये प्रवेश दिला आणि खुर्ची वर बसवून ठेवले 3 तास त्या नंतर त्यांना बेड देण्यात आला. हे सगळं करण्यासाठी, ,मी स्वतः संबंधित विभागात पाठपुरावा करीत होतो.आणि प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बोलत होतो आणि माझ्या ऑफिस मधून प्रत्येकाला डिटेल्स पाठवले जातं होते.
आज दुपार पासून नेत्रराम निषाद वय 37, बेड नंबर C 27 असून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे आणि सुका खोकला देखील आहे. त्याला तिथे ड्युटीवर असलेल्या नर्स सांगतात कि आम्हाला इन्स्ट्रकशन नाही आम्ही औषधं देऊ शकत नाहीं. BKC सेंटर तर A /c देखील नाहीं, एप्रिलचा महिना सुरु आहे कडक उन्हाळा असल्यामुळे गर्मी खूप वाढली आहे,त्या सेंटर मध्ये दुपारी पेशंट हैराण होतात उकाड्याने.
आपण पगार कमी करायचा GR काढला आहे त्यामुळे देखील खूप नाराजी आहे. डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय हे डायरेक्ट कोरोना सेंटर मध्ये पेशंट बरोबर डायरेक्ट संबंध येतो त्यांचा जीव धोक्यात घालून काम करतात आणि आपण त्यांना नक्की केलेल्या मानधनात कपात करून त्यांना नाराज करत आहात. अशामुळे आपल्याला डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय मिळणार नाहीत आणि पेशंट वाढत आहेत आपण कशी सर्व्हिस देऊ शकतो पेशंटना त्याचा विचार व्हावा.
BKC सेंटर मधील तसेच H/East वार्ड मधील आलेला अनुभव शेअर केला यावरून सर्व सामान्य माणसाची किती सासेहोलपट होत असेल याचा विचार करणे कठीण आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी पैश्याची काटकसर करून हा प्रसंग निभाऊन नेता येणार नाही. ही मी स्वतः अनुभवलेली शहरातील परिस्थिती आहे मग ग्रामीण भागातील कोरोना सेंटरची आणि हॉस्पिटलची परिस्तिथी काय असेल याचा विचार करूनच भीती वाटते.
आपले
मा. खा.हुसैन दलवाई
वांद्रे पूर्व, मुंबई