मुक्तपीठ टीम
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने तिसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. भाजपाने तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने शिवसेनेसमोर आव्हान उभं राहिलं आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार!
- राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे.
- भाजपाने पियुष गोयल यांना तिसऱ्यांदा राज्यसभेसाठी संधी दिली आहे.
- सहस्त्रबुद्धे आणि डॉ. महात्मे यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिलेली नाही.
- भाजपाने दुसऱ्या जागेसाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे माजी आमदार डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे.
- रविवारी रात्री भाजपाने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली.
- आतापर्यंत शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे उमेदवार ठरले आहेत.
- त्यामुळे आता सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
सहाव्या जागेसाठी शिवसेना, भाजपा आमने-सामने!
- महाराष्ट्रातील राज्यसभा जागासाठीचा कोटा लक्षात घेता भाजपा २, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे पाच उमेदवार आरामात निवडून येवू शकतात. प्रश्न सहाव्या जागेचा आहे.
- त्या जागेसाठी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
- आता भाजपानेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे.
भाजपा – शिवसेनेला किती मते पाहिजेत?
- विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे.
- भाजपचे १०६ आमदार असून, पक्षाकडे २२ अतिरिक्त मते आहेत.
- त्यांनाही काही अपक्षांचा पाठिंबा आहे. तरीही त्यांनाही किमान २० मतांची आवश्यकता असेल.
- शिवसेनेकडे स्वत:चे ५५ (अंधेरीचे आमदार रमेश लटकेंचं निधन झाल्याने एक कमी) आमदार आणि त्यांना पाठिंबा देणारे इतर ९ असे ६४ चे बळ आहे. त्यामुळे २२ अतिरिक्त आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना मतं दिल्यानंतर त्या पक्षाकडे किमान १० मते उरतील.
- तरीही शिवसेनेलाही आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी किमान दहा आमदारांची मते मिळवावी लागतील.
- सध्याच्या विधानसभेत आघाडीकडे १६९ (आ. लटकेंच्या निधनाने एक कमी) आमदारांचं बळ आहे. त्यामुळे खरंतर आघाडीचे चार उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक १६८ आमदारांचे संख्याबळ त्यांच्याकडे आहे.
- पण राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाचे उमेदवार वगळता इतरांच्या भूमिकेची खात्री १०० टक्के देता येत नसते.
- भाजपा आणि शिवसेनेकडे असलेले अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदारांचं बळ राज्यसभा मतदानाच्यावेळी सोबतच असेल असं १०० टक्के गृहित धरता येणार नाही.
- त्यामुळे त्यांना आपल्याशी बांधून ठेवण्याचं कौशल्यही या पक्षांना पणाला लावावं लागेल.