मुक्तपीठ टीम
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या नोटीसमुळे शरद पवार यांना आलेल्या ईडी नोटिशीचा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सप्टेंबर २०१९मध्ये ईडीची नोटीस आली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. पण शरद पवारांनी आपला पॉवरफुल गेम खेळला आणि ईडीची पिडा त्यांना भोवण्याच्याऐवजी भाजपावरच उलटली. विधानसभा निवडणुकीत सातारच्या पावसातील भाषणाएवढेच ईडी प्रकरणही राष्ट्रवादीच्या जागा वाढवणारे ठरले.
खरंतर अशी नोटीस पाठवून शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोधैर्य खचवण्याचा राजकीय डाव असल्याची चर्चा रंगली होती. त्यामागे भाजपाच असल्याचा आरोपही झाला होता. पण शरद पवार यांनी तो डाव भाजपावरच उलटवला आणि ते कुणालाच न जुमानणारे स्वाभिमानी नेते असल्याचा संदेश महाराष्ट्भर गेला. त्याचा राष्ट्रवादीला चांगलाच फायदा झाला. पाऊस कोसळत असताना साताऱ्याला केलेल्या भाषणाइतकीच ईडी कारवाईच्यावेळी शरद पवारांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसला सळसळवणारी आणि मतदारांना राष्ट्रवादीकडे वळवणारी ठरली होती.
शरद पवारांनी कसा केला होता ईडीचा गेम?
- २०१९च्या सप्टेंबरमध्ये शरद पवारांना ईडीची नोटीस आली.
- २४ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन २७ सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयात स्वत: जाणार असल्याचे पवारांनी सांगितलं.
- त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ सप्टेंबर रोजीही शरद पवार स्वत:हून ईडी कार्यालयात जाण्याचं नक्की होतं.
- शरद पवार यांनी एकट्यानेच जाण्याची घोषणा करत कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले.
- मात्र, रोहित पवार यांनी महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांना मुंबईकडे कूच करायचे आवाहन केले.
- त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी पवार ईडी कार्यालयात हजेरी लावणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
- मात्र, शरद पवारांनी ऐनवेळी पोलिसांच्या विनंतीवरून भूमिका बदलली.
- “आता चौकशीला येऊ नये, अशी ईडी आणि मुंबई पोलिसांनी विनंती केली आहे. पोलीस आयुक्तांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे मी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे.” असं शरद पवारांनी २७ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास जाहीर केलं.
- पण त्यातून शरद पवार केंद्रीय यंत्रणांच्या दहशतीला जुमानत नसल्याचा संदेश महाराष्ट्रभर गेला.
राष्ट्रवादी काँग्रेसला कसा झाला फायदा?
- शरद पवारांच्या आव्हानात्मक भूमिकेमुळे संकटांना न जुमानणारा स्वाभिमानी नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली.
- महाराष्ट्रभरातील खचलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उभारी मिळाली, ते सक्रिय झाले.
- रोहित पवारांचा त्यात मोठा वाटा, त्यांच्या आवाहनानुसार अनेक ठिकाणचे कार्यकर्ते तर मुंबईच्या दिशेनेही आलेही होते.
- आपला नेता वयाच्या ऐंशीव्या वर्षाच्या टप्प्यातही जर लढू शकतो, तर आपण का नाही? हा संदेश सामान्य कार्यकर्ते, घाबरलेल्या नेत्यांमध्ये गेल्याने तेही सळसळले.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपेक्षित आमदारांची संख्या सातारा आणि ईडी या दोन घटनांमुळे किमान १५ने तरी वाढल्याचे मानले जाते.
वाचा:
ईडीसमोर जाताना राहुल गांधी वापरणार शरद पवारांचा मार्ग!