मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘दिव्यांग’ मुलांसाठी विरारच्या अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येत्या ३ एप्रिल २०२२ रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न होणार आहे. या वसतिगृहाची निर्मिती ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशनद्वारे करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘दिव्यांग कल्याण आयुक्तालया’ने या उपक्रमास मान्यता आहे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील ‘दिव्यांग’ बालकासह त्याच्या एकल पालकाच्या’ निवासाची व्यवस्था असणार आहे. निवासासोबतच मार्गदर्शन, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी देणारे बहुदा हे पहिले वसतिगृह असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा, विश्वस्त नूतन गुळगुळे यांनी सांगितले आहे. ‘स्वानंद सेवा सदन’ असे या वसतिगृहाचे नाव असणार आहे.
दिव्यांग मुलांच्या दैनंदिन संगोपन गरजा अत्यंत वेगळ्या असल्याने हा उपक्रम राबविण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या मुलांच्या अडचणी लक्षात घेऊनच त्यांच्या वसतिगृहाच्या निर्मिती केली जाणार आहे. त्यांना आवश्यक असलेल्या सर्व सोई सुविधायुक्त अशी निर्मिती करावी लागणार आहे. या उपक्रमाच्या निर्मितीत लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता असून लोकवर्गणीतून विशेष वसतिगृहच्या निर्मितीस पाठबळ मिळावे, समाजातील संवेदनशील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे अशी इच्छा अध्यक्षा सौ. गुळगुळे यांनी व्यक्त केली आहे.
या प्रसंगी सन्माननीय मुख्य उपस्थिती मा. राजेंद्र गावित( खासदार पालघर जिल्हा), मा. हितेंद्र ठाकूर (आमदार विरार, पालघर जिल्हा), मा. सुनील देवधर(राष्ट्रीय सचिव – भाजपा), मा. डॉ. जगन्नाथ हेगडे( माजी नगरपाल – मुंबई), तसेच विशेष निमंत्रित मा. डॉ. सतीश वामन वाघ(अध्यक्ष सुप्रिया लाइफफायनान्स लिमिटेड), मा. डॉ. संजय दुधाट(कर्करोग तज्ञ), मा. डॉ. निशिगंधा वाड( शिक्षणतज्ज्ञ, अभिनेत्री) यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी स्वप्नील पंडित प्रस्तुत मराठी व हिंदी गीतांच्या संगीतमय ‘मेघ मल्हार’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.