तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम
विचार करा. इतिहास हा विजेत्यांचा लिहिला जातो. पराभूतांना खलनायकच ठरवलं जातं. पण जर पहाटे पहाटे फडणवीस-पवार जोडीनं घेतलेल्या शपथा टिकल्या असत्या. आणाभाका घेत भाजपा-राकाँपा सरकार महाराष्ट्रात सत्तेत टिकलं असतं, तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नातील नाही तर प्रत्यक्षातील मुख्यमंत्री म्हणून काय भाषण केलं असतं?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर त्यांनी न केलेले भाषण कसे असते?
अध्यक्ष महोदय,
आज सभागृहात माननीय विरोधी पक्षनेत्यांनी पेनड्राइव्ह सादर केला. त्यात एक स्टिंग आहे. त्यातील संवाद त्यांनी वाचूनही दाखवला. त्यांच्या सवयीप्रमाणे ते नेटवरही टाकतीलच टाकतील. आमचं बघून का होईना पण त्यांचेही आयटी सेल आता झालेत. कामाला लागतीलच. पण मुळात तरीही ते आमच्या मागेच आहेत. मला त्यांना सांगायचं आहे. अहो आता क्लाऊड स्टोरेजचा काळ आहे. का उगाच पेनड्राइव्ह वापरत राहता. ते असो. मला त्या तथाकथित स्टिंगचं बिंग फोडायचं आहे.
अध्यक्ष महोदय,
मुळात ते प्रामाणिक स्टिंग नाहीच ते कपटीपणाने केलेले नुरा स्टिंग आहे. तुम्हाला माहित आहेच. आधीच ठरवून जी कुस्ती होते ती नुरा कुस्ती. इथं मला दाऊदच्या भाऊ नुराचा संदर्भ द्यायचा नाही. तो गेला. पण आमचे विरोधक आता मिळेल ते शब्द वापरत आम्हाला टार्गेट करू पाहतात. म्हणून आधीच सांगितलं. हे खरं आहे की आमचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षयात्रा काढून नव्वदीच्या दशकात महाराष्ट्र ढवळून काढला होता. आमच्या काकू शोभाताई फडणवीस तेव्हा मोठ्या नेत्या होत्या. आम्ही स्थानिक पातळीवर होतो. पण तेव्हाही अभ्यास चालूच होता.
अध्यक्ष महोदय,
मुंडेसाहेबांनी ज्यांच्यावर दाऊदशी संबंधांचा आरोप केला त्यांच्याच पक्षासोबत आज आम्ही सत्तेत आहोत, यावर टीका केली जाते. पण विसरु नका काळ बदलतो. माणसं बदलतात. भाजपा बदलावर विश्वास ठेवते. बदल्यावर नाही. त्यामुळे मधल्या काळात उल्हासनगरचे पप्पू कलानी तुरुंगात होते तरी त्यांच्या कुटुंबाला सोबत घेतलं होतं. उल्हासनगरात सर्वच काही डुप्लिकेट नसतं. आमच्यासोबत आलं की नकलीचे असली बदलत असतं. आम्ही तर अस्सल गंगेचे पावित्र्य मानणारे, तसे वागणारे आहोत. त्यामुळे विरार वसईच्या हितेंद्र ठाकुरांचाही आम्हाला पाठिंबा असतो. सोबत आले पवित्र झाले.
अध्यक्ष महोदय,
ते स्टिंग हे आम्हीच नेमलेले विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना दबाव आणून तसं बोलायला लावलं गेलं आहे. त्यांचा काडीमात्र दोष नसावा. सरकारी वकील असले तरी काय झाले. घाबरले असतील. आजवर जेही आम्ही त्यांना सांगितले ते त्यांनी केले. आता त्यांच्यावर दबाव आणून ज्यांनी त्यांना बोलायला लावले, त्यासाठी जे जे केले गेले त्याची आम्ही चौकशी नक्की करू. मग त्या स्टिंगमध्ये आमचे अनिल गोटे असतील, आमचे नाथाभाऊंशी काही लिंक असेल तर त्याचीही नक्की चौकशी करू. तोपर्यंत जसा प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला तसा नाथाभाऊही राजीनामा देतील. संशयाला जागा नको.
अध्यक्ष महोदय,
आमचा पक्ष हा महान परंपरेचा आहे. हवाला प्रकरणी काही पुरावा नव्हता. एक जैन डायरी होती. तरीही आमचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा दिला होता. नाथाभाऊही ज्येष्ठ आहेत. समजू शकतात.
अध्यक्ष महोदय,
त्यात यशवंतराव प्रतिष्ठानचा उल्लेख आहे. काही ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख आहेत. विरोधक विनाकारण सुतावरून स्वर्ग गाठावा तसं शब्दांवरून पवारसाहेबांवर वार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही तसे होवू देणार नाही. मागच्या पाच वर्षात जशा आम्ही चौकशी मागून चौकशी केल्या. फाइल तयार केल्या. पण कारवाई भुजबळांशिवाय कुणावरही केली नाही. तसंच आताही करू. त्यावेळची फाइल होती त्यामुळेच तर रात्रीच्या अंधारात ठरवूनही भल्या पहाटे दादा शपथेसाठी आले ना. आमचं हे भाजपा-राकाँपा सरकार आलं ना. कसं विसरणार.
अध्यक्ष महोदय,
जाता जाता एवढंच सांगतो. राजकारणात अशीच फाइल कामाला येते. त्यामुळे आम्ही सांगतो.
फाइल कामाला येईल. फाइल कामाला येईल. पुन्हा पुन्हा फाइलच कामाला येईल!
(भांग न घेता संपूर्ण शुद्धीत धुळवडीनिमित्त दिवसाढवळ्या केलेला कल्पनाविलास…हे १०० टक्के काल्पनिक आहे. कुणाला वाईट वाटलं तर वाटू द्या, हा कल्पनाविलासाचा रंग आज एन्जॉय करा.)
मुक्तपीठ – होळीनिमित्त फूल टू फेक बातमीपत्र – धुळवडीनिमित्त कल्पनाविलास:
- उद्धव ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख असते तर… वाचा उद्धव ठाकरेंनी न दिलेली आणि संजय राऊतांनी न घेतलेली रोखठोक मुलाखत…
- देवेंद्र फडणवीस भाजपा-राकाँपा युतीचे मुख्यमंत्री असते तर…मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी विधानसभेत न केलेले स्टिंगचं बिंग फोडणारं भाषण…
- अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते असते तर…अर्थसंकल्पातील अनर्थ मांडत शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, एसटीच्या उपेक्षेवर काय बोलले असते?
- प्रवीण दरेकर हे भाजपाचे नेते नसते, तर किरीट सोमय्या काय बोलले असते? “दरेकरांशी राऊत, पवारांचं संगनमत, पोलीस काय करणार? आता सीबाआय, ईडी मागे लावतो!” बोलले असते?
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क – 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite @Muktpeeth