तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जर राज्याचे विरोधी पक्षेनेते असते तर आपल्या सरळस्पष्ट शैलीत त्यांनी अर्थसंकल्पावर नेमकं काय भाषण केलं असतं, याच्या कल्पनाविलासाचा त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनात वावरतानाच्या वागण्या-बोलण्याच वेध घेत केलेला हा एक प्रयत्न:
अजित पवार विरोधी पक्षनेते असते तर त्यांनी न केलेले भाषण कसे असते?
अध्यक्ष महोदय,
राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी उभा आहे. या राज्यात काहीजणांचा आव असा असतो की अर्थव्यवस्था वगैरे त्यांनाच कळते. बोलू द्या. काहीही बोलू द्या. माननीय शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेली तीन दशके राजकीय सामाजिक जीवनात वावरताना आम्हीही खूप काही शिकलो आहोत. अर्थसंकल्प आम्हीही केला आहे. यावेळचा अर्थसंकल्प खरं तर अर्थ नसलेला अनर्थसंकल्प आहे. सामान्यांच्या तोंडाला पानंच पुसली गेली आहेत.
मुळात सुरुवातीलाच मला लक्षात आणून द्यायचं आहे की या सरकारला कमवायची अक्कल नाही, असे तिखट मी बोलणार नाही. पण महसूल मिळवू, वाढवू न शकणारं हे सरकार फक्त दारूतून पैसे मिळवण्याच्या शॉर्टकटवर जात राहते. आता तर काय वाइनही दुकानात विकणार आहेच. माननीय पवारसाहेबांच्या विचारांनुसार आम्ही २०११च्या दरम्यान तसा प्रस्ताव आणला तर हेच शिवसेनेवाले-भाजपावाले आमच्यावर तुटून पडले. पण ते असो.
एकीकडे महसूल नाही आणि दुसरीकडे खर्च करायचीही यांची कुवत नाही. एक एप्रिल २०२१मध्ये जे अर्थसंकल्पीय वर्ष सुरु झाले त्याचे दहा महिने उलटले होते तरी त्यांचा केलेल्या तरतुदीतील खर्च फक्त ३८ टक्के होता. आता कुठे तो मार्च अखेरीस नोकरशाहीच्या ओव्हरटाइमने खर्च झाला.
हा वर्ष २०२२-२०२३चा अर्थसंकल्प आहे. आरोग्याचे कमी केले. मुळात यांच्या आरोग्यमंत्र्यांना पण काय पडलेली नसेल. कारण त्यांनी गेल्या वर्षी कोरोना असतानाही जानेवारीपर्यंत फक्त ४३ टक्केच खर्च केला होता.
पर्यावरण खाते दहा टक्क्यांखाली होतं. सार्वजनिक बांधकाम एवढे मोठे नेते पाहतात. पण तेही तेवढेच मागे होते.
अध्यक्ष महोदय,
दिलेला पैसा खर्च करत नाही आणि मग तरीही रिकाम्या तिजोरीचा खडखडाट कसा सांगतात. यांच्याकडे शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, संगणक चालक यांना पुरेसे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. यांना एसटी महामंडळाचे सरकारीकरण शक्य नाही असं वाटतं. खरंतर मला वाटतं राष्ट्रवादीने निवडणूक जाहीरनाम्यात सरकारीकरणाचे आश्वासन दिल्यामुळे यांना तसे शक्यच नाही असे वाटले असेल. कारण हेच पसरवतात, आमचे साहेब जे बोलतात, ते करत नाहीत, जे करतात ते बोलत नाहीत. असो.
आता थांबतो. कारण जास्त मोकळे बोलल्यामुळे एकदा प्रायश्चित घेवून झाले आहे. पुन्हा ते नको.
(भांग न घेता संपूर्ण शुद्धीत धुळवडीनिमित्त दिवसाढवळ्या केलेला कल्पनाविलास…हे १०० टक्के काल्पनिक आहे. कुणाला वाईट वाटलं तर वाटू द्या, हा कल्पनाविलासाचा रंग आज एन्जॉय करा.)
मुक्तपीठ – होळीनिमित्त फूल टू फेक बातमीपत्र – धुळवडीनिमित्त कल्पनाविलास:
- उद्धव ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख असते तर… वाचा उद्धव ठाकरेंनी न दिलेली आणि संजय राऊतांनी न घेतलेली रोखठोक मुलाखत…
- देवेंद्र फडणवीस भाजपा-राकाँपा युतीचे मुख्यमंत्री असते तर…मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी विधानसभेत न केलेले स्टिंगचं बिंग फोडणारं भाषण…
- अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते असते तर…अर्थसंकल्पातील अनर्थ मांडत शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, एसटीच्या उपेक्षेवर काय बोलले असते?
- प्रवीण दरेकर हे भाजपाचे नेते नसते, तर किरीट सोमय्या काय बोलले असते? “दरेकरांशी राऊत, पवारांचं संगनमत, पोलीस काय करणार? आता सीबाआय, ईडी मागे लावतो!” बोलले असते?
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क – 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite @Muktpeeth