मुक्तपीठ टीम
सध्या भारतीय रेल्वे आपल्या सेवेत आणि प्रवासात उत्तम बदल घडवत आहे. भारतातील पहिली सेमी-हाय स्पीड मालगाडी डिसेंबरपर्यंत रुळावर धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. सोळा मालडब्यांच्या गती शक्ती रेल्वेचा वेग १६० किमी प्रतितास असेल. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ते तयार करण्यात येत आहे. या गाड्यांसाठी डिझाइनिंगचे काम सुरू झाले आहे. रेल्वेने साहित्याची ऑर्डरही दिली आहे. या वर्षी डिसेंबरपर्यंत यापैकी दोन गाड्या तयार होतील. अशा २५ गाड्या तयार करण्याचे रेल्वेचं लक्ष्य आहे.
या गाड्यांद्वारे ई-कॉमर्स आणि कुरिअर पार्सल सेगमेंटला लक्ष्य करण्याचा रेल्वेचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक रेल्वेमध्ये दुग्धजन्य पदार्थ, मासे, फळे आणि भाजीपाला यांसारख्या नाशवंत वस्तू वाहून नेण्यासाठी रेफ्रिजरेटेड जेटेड वॅगन्स देखील असतील. या वॅगनसाठी डब्यातून वीज जोडणी दिली जाणार आहे. कंटेनर लोडिंग आणि अनलोड करण्यासाठी प्रत्येक डब्याला दोन रुंद दरवाजे असतील. भारतीय रेल्वेने देशभरात ७४ नवीन गति-शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल्स ओळखले आहेत. त्यापैकी २० दक्षिण भारतीय राज्यांमध्ये आहेत.
नवीन वंदे भारत रेल्वेची लवकरच होणार चाचणी
- नवीन सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची चाचणी ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे.
- १६ डब्यांच्या सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा नवीन संच अंदाजे ११५ कोटी रुपये खर्चून बांधला जाईल. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
- रेल्वेने ऑगस्ट २०२३ पर्यंत अशा ७५ गाड्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की अशा दोन रेल्वे आधीच दिल्ली -कटरा आणि दिल्ली-वाराणसी दरम्यान धावत आहेत. या नव्या रेल्वेसमध्ये सुरक्षेसोबतच अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये असतील. वंदे भारत रेल्वेच्या नवीन सेटचे सर्वात मोठे सुरक्षा वैशिष्ट्य म्हणजे टक्कर टाळण्याची यंत्रणा. ही रेल्वे ९९ टक्के स्वदेशी असेल. फक्त काही किरकोळ घटक आयात केले जातील. इंटिग्रल कोच फॅक्टरी दरमहा सुमारे १० गाड्या तयार करण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०२३ पर्यंत अशा ७५ रेल्वे बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.