हेरंब कुलकर्णी
————————————–
मासा मारायला किमान पाण्यात जावं लागतं
वाघ मारायला तर थेट जंगलात जावं लागतं
ह्या शिकारींपेक्षा खुप खुप सोप्प असतं
भर दिवसा रस्त्यात कार्यकर्ता मारणं !
कार्यकर्त्याला मारणं सोपं असतं यासाठीही
झेड प्लस सेक्युरीटी नसलेला तो
मारण्यासाठी मारेकऱ्यांना
कुठेही उपलब्ध असतो…कधीही
प्रस्थापित नेत्याला मारणं सोडाच
त्याच्या फ्लेक्सला थोड़ी इजा झाली तरी
इथं पेटतात शहरं आणि माणसंसुद्धा
कार्यकर्त्याला मारणं सोपं यासाठीही
की कार्यकर्त्याचे अनुयायी असतात अहिंसेचे पुजारी
करतात फ़क्त निदर्शने आणि उपोषणं
ज्याने आमचं सरकार पडत नाही,
की शेअरबाजार गडगडत नाही…
धर्मांधाचे बुरखे फाड़त
‘ इंडीया’ च्या वेगवान विकासरथाला
अड़थळे ठरणारे
‘स्पीडब्रेकर्स’ कार्यकर्ते आता उखडायला हवेत…
शोषितांच्या डोळ्यातील विद्रोही स्वप्न
मारण्यापेक्षा
कार्यकर्त्यांना मारणं खुप खुप सोपं असतं….!
(शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि कार्यकर्ते असणारे हेरंब कुलकर्णी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्या थेट जाणून घेतात, अनुभवतात आणि सोप्या शब्दांमध्ये मांडतात. त्याबरोबरच त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व काव्यक्षेत्रातही प्रसिद्ध आहे. संपर्क – ८२०८५८९१९५ )