मुक्तपीठ टीम
जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणाला मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. याचवेळी कोकणाच्या मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले. अनेक संस्था, अनेक दिग्गज लोकांनी यावेळी मदत केली. मात्र जसजसा कोकणातील पूर ओसरला तसतसे मदतीचे हातही ओसरत गेले. मात्र, अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचं नाम फाऊंडेशन मात्र पूरग्रस्तांना विसरले नाही. त्यांनी नुकतीच पोलादपूरच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केलीय.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशन
- गेल्या २१ व २२ जुलै रोजी आलेल्या महापूरात महाड आणि पोलादपूरमध्ये मोठे नुकसान झाले.
- या तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांना नाम फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोच्या मध्ये वसलेल्या शाळांमधील ११६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहेत.
- यामध्ये पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या बोरावळे शाळेतील ८ विद्यार्थी, घागरकोंड शाळेतील ८, रानवडी बुद्रुक २८, रानबाजिरे १२, कापडे बुद्रुक २०, महाळुगे धनगरवाडी ४, दहीदुर्गवाडी ३, तळ्याची वाडी १२, आडावळे बुद्रुक ११ व चांभरगणी बुद्रुक १० अशा एकूण दहा शाळातील ११६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
- शैक्षणिक साहित्याचे किटमध्ये विद्यार्थ्यांसाठी दप्तर, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, लिहिण्याचे पॅड, स्केचपेन, रंगीत खडू, चित्रकला वही, कंपास पेटी व लेखनाच्या वह्या यांचा समावेश आहे.
- तसेच सरपंच वैभव चांदे यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
- बोरावळे ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव चांदे, आवळे, घागरकोड शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिंदे, बोरावळे शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील, माजी उपसरपंच पांडुरंग मोरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कोळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुप्रिया पाटील यांनी केले.
नाम फाऊंडेशन सदैव कोकणाच्या मदतीसाठी तत्पर
चित्रपट सृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या नाम फाऊंडेशनने मागील वर्षभरात कोकण परिसरासाठी विशेषतः रायगड जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोलाचे सहकार्य केलेले आहे.
त्यामध्ये फयाण चक्रीवादळग्रस्त शेतकऱ्यांना केलेली मदत; महाड, पोलादपूर मधील महापुरा मध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना अन्नधान्याच्या स्वरूपात केलेली मदत आणि आज वाटप करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात केलेली मदत यांचा समावेश आहे.