मुक्तपीठ टीम
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत बालकांच्या झालेल्या मृत्यूबाबत सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना राजेश टोपे बोलत होते. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. नवीन बांधकाम होणाऱ्या रुग्णालयात फायर एनओसी व इतर आवश्यक त्या एनओसी असल्याशिवाय हस्तांतरित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रीक ऑडिट, मॅाक ड्रील, फायर एनओसी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले.
भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. कंत्राटी तत्वावर असलेले बालरोग तज्ज्ञ व २ स्टाफ नर्स यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली करण्यात आली असल्याचे टोपे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सदस्य परिणय फुके यांनी भाग घेतला.