मुक्तपीठ टीम
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या आपटे वसतिगृह (मुलींचे), सुमित्रा सदन वसतिगृह (मुलींचे) व लजपतराय विद्यार्थी भवन (मुलांचे) येथील ६६१ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या पुढाकाराने खास समितीच्या विद्यार्थ्यांसाठी दंत तपासणी, नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन आणि तंदुरुस्ती तपासणी शिबीर आणि जागृतीपर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
डॉ. नितीन कोलते, डॉ. मंजुश्री कुलकर्णी, डॉ. आकांक्षा बत्रा, डॉ. अनिकेत कासोदेकर, डॉ. सायली केले-वाणी, डॉ. भक्ती कासोदेकर, डॉ. हेमंत जाधव, डॉ. सागरिका बसवराज या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सलग तीन शनिवार हे शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनावेळी विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, विश्वस्त सुप्रिया केळवकर, राजेंद्र ततार, रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे अध्यक्ष उज्ज्वल केले, कम्युनिटी डायरेक्टर अतुल परचुरे, सचिव राधा गोखले, स्नेहा सुभेदार आदी उपस्थित होते.
उज्वल केले म्हणाले, “बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी ग्रामीण भागातून आलेले असल्याने त्यांना या शिबिराचा लाभ झाला. योग्य ठिकाणी हा उपक्रम राबविल्याने समाधान आहे. सर्व रोटरी सदस्य आणि डॉक्टरांनी अतिशय मन लावून काम केले. समितीच्या विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जेवण मिळत असल्याने तसेच नियमित तपासणी होत असल्याने त्यांचे आरोग्य चांगले असल्याचे आढळले. आरोग्यासाठी पोषक वातावरण समितीमध्ये दिले जात असल्याबाबत डॉक्टरांनीही समाधान व्यक्त केले.”
तुकाराम गायकवाड म्हणाले, “समितीमध्ये नेहमीच आरोग्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना योगासने, व्यायाम अनिवार्य असल्याने तसेच पोषक आहार दिला जात असल्याने आरोग्याच्या फारशा समस्या आढळत नाहीत. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या या पुढाकाराने विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याची स्थिती तपासून घेता आली. सर्व पदाधिकाऱ्यांचे व डॉक्टरांचे आभार मानतो.”