मुक्तपीठ टीम
केंद्रातील भाजप सरकारच्या कृषि कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांमधील असंतोष वाढतानाच दिसत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना त्या असंतोषाचा नुकताच फटका बसला. पक्षाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री खट्टर हे कृषी कायद्याचे फायदे सांगण्यासाठी हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील कमला गावात सभा घेणार होते. पण सभेपूर्वीच आंदोलक शेतकर्यांनी सभास्थानी तोडफोड केली. शेतकऱ्यांचा संतापाविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी महापंचायत रद्द केली.
मुख्यमंत्री खट्टर यांची सभा असलेल्या कमला गावच्या दिशेने निघालेला शेतकरी मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. पाण्याच्या तोफांचा आणि अश्रूधुराचाही मारा केला. परंतु, आंदोलक शेतकरी बधले नाहीत. त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचून मुख्यमंत्र्यांच्या ‘किसान महापंचायत’ कार्यक्रमात अडथळा आणला.
राष्ट्रीय माध्यमांमधील माहितीनुसार, शेतकरी आंदोलकांनी सभामंचाचे, त्यावरील खुर्च्या, टेबल यांची तोडफोड केली. भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांच्या संतापासाठी भारतीय किसान युनियनचे नेते गुरनामसिंग चारुणी यांना जबाबदार ठरवलं आहे. त्यांच्या सांगण्यावरून शेतकरी असे वागले, असा आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
भारतीय किसान युनियनने भाजपच्या किसान महापंचायतीला विरोध करणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. गेले दीड महिना आंदोलक शेतकरी तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करीत आहेत. त्यांच्यापैकीच काही शेतकरी काळे झेंडे घेऊन आले. त्यांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत कमला गावाजवळ मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला.
शेतकरी आंदोलक कार्यक्रमस्थळी पोहोचू नये म्हणून पोलिसांनी गावाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेट्स लावले. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होऊन देणार नाही या मतावर शेतकरी अडले होते. निषेध करणार्या शेतकर्यांना पोलीस शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले पण त्यांनी कुणाचंही न ऐकता, कुणालाही न जुमानता मंचावर कब्जा केला होता. अखेर तोडफोडीतून व्यक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाविषयी कळताच मुख्यमंत्री खट्टर यांनी कृषी कायदे समर्थक किसान महापंचायत रद्द करावी लागली.