प्रा. हरी नरके
खेळात जाती बघून खेळाडू निवडावेत का? सोबत दोन क्रीडा स्पर्धेची पोस्टर्स जोडली आहेत. त्यातल्या अटी वाचा. फक्त विशिष्ट जातीच्याच खेळाडुंना प्रवेश असतील, मैदानात जातीची प्रमाणपत्रे सोबत आणावीत, इतर जातीचे खेळाडू आढळल्यास संघ बाद केला जाईल अशा अटी असाव्यात का? तुम्हाला काय वाटते? सभ्य, संयमित आणि समंजस भाषेत व्यक्त व्हावे. कोणत्याही समाजाबद्दल कटुता अथवा द्वेषभावना वाढेल असे लेखन कृपया टाळावे. आपल्याला गोळ्यामेळ्याने राहायचे आहे. आपण सगळी भावंडं आहोत याचा विसर पडू देऊ नये. या पोस्टरवर शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांची छायाचित्रे आहेत. मग संयोजकांचा हेतू हा संकुचित वाटतो की योग्य वाटतो?
दुसऱ्या पोस्टरवर एका जातीच्या नावाने स्पर्धा भरवल्याचे दिसते. त्यातल्या संघांना एका विशिष्ट जातीत अभिमान म्हणून मिरवली जाणारी नावं दिलेली दिसतात. हा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाणारा आहे यावर चिंतन व्हायला हवे व संयोजकांनी त्याबाबत विधायक भूमिका घ्यायला हवे.
पौरोहित्यावरील टीका अशी संपवा!
१०० वर्षांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एक तोडगा सुचवला होता. पौरोहित्य हा एक व्यवसाय आहे. पोटापाण्याचा रोजगार आहे.तो सर्व हिंदूंना खुला असावा. म्हणजे जसे वकील,सीए, डॉक्टर, प्राध्यापक, न्यायाधीश परीक्षा देऊन होता येते तशीच विद्यापीठीय परीक्षा पास करून कोणाही हिंदूला पुरोहित बनता आले पाहिजे.
आज सगळे पुरोहित एकाच जातीतले असल्याने त्यांच्यावरची टीका एका जातीवरची वाटू शकते. मग स्वतः ब्राह्मण समाजाने पुढाकार घेऊन हे शतकांचे १००% आरक्षण सोडावे आणि मराठा, कुणबी, तेली,आगरी, भंडारी, धनगर, गुरव, मातंग, चर्मकार, कैकाडी, वडार आदी सर्व ४६३५ हिंदू जातींना पुरोहित बनण्यासाठी दरवाजे खुले करून द्यावेत.
आज पंढरपूर वगैरे काही ठिकाणी जी सुरुवात झालीय इतर जातींचे पुजारी बनवण्याची ते सार्वत्रिक करावे. हीच पद्धत अगदी शंकराचार्य पदापर्यंत चालू ठेवावी. आजही घैसास गुरुजींच्या वेदभवनमध्ये फक्त एकच जात प्रवेशपात्र मानली जाते, द्या ना सर्व हिंदूंना मुक्त प्रवेश!
मला वाटते ब्राह्मण समाजावरची (पुरोहित संदर्भातली ) सगळी टीका संपवण्याचा हा रामबाण उपाय ठरेल!
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)