मुक्तपीठ टीम
राज्यामागून राज्यांमध्ये सत्ता गमावत असूनही काँग्रेस पक्षश्रेष्ठींचं लक्ष उरले सुरले नेतेही टिकवण्याकडे दिसत नाही. गेल्या निवडणुकीआधी गुजरात काँग्रेसला बळ देण्यासाठी आणले गेलेले पुढची निवडणूक तोंडावर आली असताना पक्षावर चांगलेच चिडले आहेत. लग्न होताच नसबंदी करावी तसं काँग्रेसनं माझं केलं, असा खोचक टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
नसबंदी केलेल्या नवविवाहित वरासारखी अवस्था!
गुजरातमधील पाटीदार नेते आणि काँग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष हार्दिक पटेल हे आपल्याच पक्षावर नाराज असल्याचे दिसत आहे. काँग्रेसवर निशाणा साधत पटेल यांनी काँग्रेस पक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अलीकडेच, २०१५ च्या एका प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने हार्दिक पटेल यांना मोठा दिलासा देत त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.
काँग्रेसने त्यांच्याकडे “दुर्लक्ष” केल्याचा आरोप करत हार्दिक यांनी सांगितले की, “पक्षात माझी अवस्था नसबंदी केलेल्या नवविवाहित वरासारखी आहे.”
नवी निवडणूक, नवा पटेल!
नरेश पटेल यांच्याबद्दल बोलताना हार्दिक म्हणाले, “मी पाहत आहे की, २०२२ च्या निवडणुकीसाठी काँग्रेस नरेश पटेल यांना सामील करत आहे. मला आशा आहे की, ते २०२७ च्या निवडणुकीसाठी नवीन पटेल शोधणार नाहीत. पक्ष त्यांच्याकडे आधीपासून असलेल्या नेत्यांचा वापर का करत नाही?” जेव्हा नेत्यांच्या समावेशासारख्या निर्णयांचा विचार केला जातो तेव्हा भाजपा “आक्रमक आणि तयार” दिसते. ते म्हणाले, “आम्ही नरेश पटेल पक्षात सामील होण्याचे बोलून दोन महिने झाले, पण काँग्रेस निर्णयावर आलेली नाही. जर तुम्ही एखाद्या समाजाचा आदर करू शकत नसाल तर तुम्हाला त्याचा अनादर करण्याचा अधिकार नाही.
‘मग या पदाचा अर्थ काय?’
- मला पीसीसीच्या कोणत्याही बैठकीला आमंत्रित करण्यात आलेले नाही, ते कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माझा सल्ला घेत नाहीत, मग या पदाचा नेमका अर्थ काय?
- अलीकडेच पक्षाने ७५ नवीन सरचिटणीस आणि २५ नवीन उपाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
- त्यांनी माझा सल्लाही घेतला होता का?