मुक्तपीठ टीम
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’अंतर्गत देशभरात दि. १३ ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम साजरा होणार आहे. या उपक्रमाकरीता ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांचे सर्व मुख्याधिकारी यांना पाठविलेल्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचनांबाबत कळविण्यात आले आहे.
दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, सर्व शासकीय / निमशासकीय / खासगी आस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. वरील तीन दिवसांच्या कालावधीत घरोघरी दररोज संध्याकाळी झेंडा उतरविण्याची गरज नाही. तथापि, कार्यालयांना यासंबंधी ध्वजसंहिता पाळावी लागेल. घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या सूचना व नियमावलीबाबत नागरिकांत जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे. जिल्हा स्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांची मदत घेवून स्थानिक वृत्तपत्रांत बातम्या, स्थानिक केबल, रेडीओ चॅनल, सोशल मीडीया, होर्डींग्ज, बॅनर इत्यांदी मार्फत प्रचार प्रसिद्धी करावी.
ती शासनाच्या https://mahaamrut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर याबाबतची माहिती कोणत्याही विभागास / नागरिकाला उपलब्ध होऊ शकते. त्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यात यावा. ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या असून याबाबतचे शासन परिपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या संकेतस्थळावर IEC आयईसी साहित्य उपलब्ध आहे. प्रसार, प्रचार व जाणीव जागृती मोहिमेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, जाहिराती, लघु चित्रपट, सेलिब्रिटीच्या माध्यमातून आवाहन, पोस्टर इ. याची निर्मिती केली आहे. http://mahaamrut.org/Download.aspx या लिंकवरुन ती माहिती, शिक्षण व संवाद साहित्य डाऊनलोड करावे. गावस्तरापर्यंत झेंडे वितरण, संकलन आदी कामांची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे.