मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा उद्रेकात धार्मिक स्थळे बंद केली होती. पण तरीही थंड न बसता देशभरातील गुरुद्वारे, शेगावचे गजाजन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे साई संस्थान अशा अनेक धार्मिक संस्थांनी कोरोना सेवाकार्यात भाग घेतला. आता त्यात एक नाव जोडलं गेलं आहे ते मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याचे.
दर्ग्याच्या व्यवस्थापनाने लसीकरण केंद्रासाठी जागा देण्यास तयारी दाखवली आहे. त्यासोबतच माटुंगा येथील मशिद, माहिम कब्रस्तान आणि ग्रीन बॉम्बे स्कूल या ठिकाणीही लसीकरण सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. मुस्लिम समाजात लसीकरणाबद्दल प्रचंड गैरसमज आहे. त्यामुळे भाविकतेने या धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांना तेथेच लसीकरण चालताना दिसले की ते स्वयंस्फूर्तपणे लसीकरणासाठी तयार होतील. एकप्रकारे त्यांचे दर्शन आणि प्रसाद म्हणून लसीकरणही होऊन जाईल.
हाजी अली व माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या ठिकाणी खुले लसीकरण सुरू करता येईल, त्यामुळे जेणेकरून त्या भागातील प्रत्येकाला लस मिळेल. ही जागा स्थानिकांसाठी सोयीस्कर असेल. याच दर्ग्यातर्फे घरोघरी लसीकरण सुविधेसाठी मोबाइल लसीकरण व्हॅनचाही विचार करण्यात येत आहे.
लसीकरणाची गरज ओळखून आता धार्मिक संस्थाही पुढे सरसावत आहेत. निर्बंध हटवल्यानंतर धार्मिक स्थळी भाविक येऊ लागतील. त्यावेळी त्यांच्यातील लसीकरण टाळणाऱ्यांना तेथून लसीकरणाची प्रेरणा मिळेल. काहीजण तेथेच करतीलही. त्यामुळे लसीकरण प्रभावी आणि व्यापक स्तरावर होऊ शकेल. फक्त मनपा अधिकाऱ्यांसमोर अडचण आहे ती लसींच्या पुरवठ्याची. या महिन्यात जर तो सुधारला आणि पुरेसा होऊ लागला तर त्यांना दर्ग्यानेच त्यांची मन्नत पूर्ण केली असं वाटेल.
पाहा व्हिडीओ: