मुक्तपीठ टीम
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजही एक गूढच आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांचा मृत्यू जपानमधील विमान अपघातात झाला, तर काहींच्या मते उत्तर प्रदेशचे ‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी होते. हे दावे कितपत खरे आहेत हे कोणालाच माहीत नाही, परंतु अलीकडच्या घडामोडींमुळे गुमनामी बाबां हेच नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याचा दावा अधिक बळकट झाला आहे.
सरकार संचालित सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने गुमनामी बाबाचा डीएनए रिपोर्ट शेअर करण्यास नकार दिला आहे. हा रिपोर्ट पश्चिम बंगालमधील हुगळी येथील संशोधक विद्यार्थी सायक सेन यांनी आरटीआय अंतर्गत मागवला होता. त्यांने २४ सप्टेंबर २०२२ रोजी आरटीआय दाखल केला होता.
लॅबचा रिपोर्ट शेअर करण्यास नकार!… दिली तीन कारणे
- विद्यार्थी सायक सेन म्हणाला की, लॅबने त्यांचा आरटीआय नाकारण्याची तीन कारणे दिली आहेत.
- मुख्य कारणांपैकी एक म्हणजे गुमनामी बाबाचा इलेक्ट्रोफेरोग्राम रिपोर्ट सार्वजनिक केल्याने भारताच्या सार्वभौमत्वावर आणि परकीय राज्यांशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
- याशिवाय सेन यांनी त्यांच्या आरटीआयमध्ये उत्तर प्रदेशातील दुर्गम भागात राहणारा माणूस भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी इतका महत्त्वाचा का आहे आणि त्याचा इलेक्ट्रोफेरोग्राम सार्वजनिक केल्यास देशात खळबळ कशी निर्माण होईल, असा प्रश्नही विचारला आहे.
- गुमनामी बाबा सामान्य माणसांपेक्षा खास होते, असे स्पष्ट संकेत आहेत, असे सेन म्हणाला.
- माझ्या सर्व निष्कर्षांनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस हे गुमनामी बाबांच्या वेशात होते. असे सेन म्हणाला.