मुक्तपीठ टीम
कर बुडवल्याच्या संशयामुळे जीएसटी इंटेलिजेंस महासंचालयाच्या (DGGI) टीमने गुरुवारी सकाळी मुंबईत मुख्यालय असलेल्या एका अत्तर कंपनीवर धाडी घातल्या. समाजवादी पार्टीच्या नेत्यांशी जवळीक असलेल्या पियुष जैन यांच्याशी संबंधित धाडसत्रात जीएसटी टीमला रोकड घबाड सापडले. नोटांच्या थप्प्यांचे पार्सल, नोटा मोजायच्या मशीन्स पाहून त्या टीमचे डोळे दिपले. सर्वात मजेदार गोष्ट अशी की, ज्याच्याकडे एवढी रोकड सापडली त्या मालकाने नुकतेच ‘समाजवादी’ या ब्रँडने नवे परफ्युम बाजारात आणले होते. त्याचा शुभारंभ समाजवादी पार्टी नेते अखिलेश यादवांच्या हातून झाल्यानंतरच अत्तर कंपनीत गैरव्यवहारांचा दुर्गंध असल्याचे जीएसटीला जाणवले!
नेमकी कशी झाली कारवाई?
- अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या घर, कारखाना, कार्यालय, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपही धाडी घातल्या.
- कानपूर, कन्नौज, गुजरात, मुंबई येथील आस्थापनांवर एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली.
- पियुष जैन यांनी महिनाभरापूर्वी समाजवादी नावाने परफ्युमही बाजारात आणला होता.
- अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून कागदपत्रे आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५० कोटी रुपयांचे कर बुडवल्याचे पुरावे सापडले आहेत.
- शेल कंपन्यांच्या माध्यमातून १०० कोटींहून अधिक कर्ज घेतल्याचीही चर्चा आहे.
समाजवादी अत्तरवाले पियूष जैनचे शेकडो कोटींचे व्यवहार….
- अत्तर व्यापारी पियुष जैन हे मूळचे कन्नौजमधील छिपट्टी येथील आहेत.
- सध्या ते जुही पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदपुरी येथे राहतात.
- ते सपाच्या एका नेत्याच्याही जवळचे आहेत.
- कन्नौजमध्ये त्यांचा अत्तरचा कारखाना, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंप आहे.
- अत्तर कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत असून तेथे घरही आहे.
- गुरुवारी सकाळी मुंबईतील एक पथक कानपूरच्या अधिकाऱ्यांसह आनंदपुरी येथील घरी पोहोचले.
घरातील सदस्यांची चौकशी करण्यात आली. कनौज येथील कारखान्यातून अत्तर मुंबईला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इथले अत्तर देश-विदेशात विकले जाते. पीयूष जैन यांच्या सौदी अरेबियातील दोन, देशाच्या पूर्वेकडील राज्यांसह सुमारे ४० कंपन्या आहेत.
पीयूष जैन यांनी महिनाभरापूर्वी लखनौमध्ये समाजवादी अत्तर लॉन्च केला होता. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले होते की, २०२२ च्या निवडणुका लक्षात घेता २२ फुलांपासून हा अत्तर बनवला आहे.