मुक्तपीठ टीम
एकीकडे महाराष्ट्रातील पोलिसांना बदनामी सहन करावी लागत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या वावटळीत पोलिसांची प्रतिमा पणास लागत असताना महाराष्ट्रातील एका पोलीस अधिकाऱ्याने बजावलेली कामगिरी प्रशंसास्पद अशी आहे. आरपीएफचे उपनिरीक्षक पांडुरंग धनराज पाटील यांनी आपल्या तांत्रिक कौशल्य ज्ञानाच्या बळावर रेल्वेला भेडसावणाऱ्या ई-तिकिट घोटाळ्याचा शोध घेऊन घोटाळेबाजांना गजाआड केलं.
काही वर्षांपूर्वी रेल्वेला ई-तिकिट घोटाळ्यांच्या वाढत्या गुन्ह्यांनी त्रस्त केले होते. चांगल्या उद्देशाने सुरु केलेली ही योजना घोटाळेबाजांनी हॅक केल्यासारखेच झाले होते. रेल्वेची बदनामी वाढतच होती. त्याचवेळी रेल्वे सुरक्षेसाठीच्या आरपीएफमधील पोलीस उपनिरीक्षक पांडुंरंग पाटील शांतपणे तपास करत होते. टेक कॉप म्हणून ओळखले जाणारे उपनिरीक्षक पाटील यांनी साय बर तपास करून घोटाळा कसा घडतो ते शोधले. त्याचवेळी सुरु झाली देशभर मोहीम.
आरपीएफच्या स्पेशल टीमने मुंबईसह देशभरातील रेल्वे तिकिट दलालांच्या विरोधात एक मोहीम राबवली. त्याअंतर्गत जवळजवळ ७८ कोटींची ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई आरपीएफची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते. लोक सतत तक्रारी करत असत की त्यांना ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळत नाही. यानंतर, तांत्रिकदृष्ट्या दक्ष अधिकाऱ्यांना आरपीएफचे विशेष पथक तयार करून हे काम सोपविण्यात आले होते.
या पथकात आरपीएफचे उपनिरीक्षक पांडुरंग धनराज पाटील यांचाही समावेश होता. पुण्याच्या आरपीएफ सायबर क्राइम विभागात असताना पाटील यांनी तिकीट दलालांना केवळ तांत्रिक ज्ञानाने पकडलेच नाही तर त्यांचे रॅकेट उध्वस्त करण्याचे कामही केले. याशिवाय कल्याण आरपीएफमध्येही त्यांनी इतर गुन्ह्यांच्या तपासाचीही कामगिरी बजावली.
महाराष्ट्रात रेल्वे विभागात वाढणार्या सायबर क्राइम रोखण्याच्या या कार्याबद्दल आरपीएफच्या जवानांना गौरविण्यात आले आहे. आरपीएफचे उपनिरीक्षक पांडुरंग धनराज पाटील यांना आरपीएफच्या महासंचालकांच्या हस्ते महानिदेशक आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना २६ मार्च २०२१ रोजी देण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ: