मुक्तपीठ टीम
ज्यांनी अनेक दशकांपासून आपल्या आवाजाच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केलं त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या ९३व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची कोरोना आणि निमोनियामुळे झालेल्या आरोग्य समस्यांशी झुंज सुरु होती. गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत सारखा चढउतार सुरु होता. लता मंगेशकर गेले २८ दिवस रुग्णालयात दाखल होत्या. आठ दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाने सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.
कोरोनाचं निदान झाल्यानंतर त्यांना ८ जानेवारीला मुंबईतल्या ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. त्यांना निमोनियाही झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचं वयोमान पाहता त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. कोरोना आणि निमोनियावर मात करत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली होती. मात्र शनिवारी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं.
शनिवारी संध्याकाळी लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतुत समदानी यांनीही आरोग्य अपडेट जारी केले तेव्हाच गंभीरता लक्षात आली होती. संध्याकाळी माध्यमांशी बोलताना डॉक्टर म्हणाले, ‘आम्ही लतादीदींवर आवश्यक ते सर्व उपचार करत आहोत. आम्ही अॅग्रेसिव्ह थेरपीवर देत आहोत. उपचारांना त्या प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
गानकोकिळेची रुग्णालयात आजारपणाशी झुंज
- लता मंगेशकर यांना ११ जानेवारी २०२२ रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लता मंगेशकरांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
- त्यांची लक्षणे सौम्य असली तरी वयामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
- १२ जानेवारीला डॉक्टरांनी माहिती दिली की लता मंगेशकर या न्यूमोनियाशीही झुंज देत आहेत.
- त्यावेळी त्यांना १०-१२ दिवस आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
- त्यानंतर त्या रुग्णालयातच असल्या तरी प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.
- मात्र, शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
- त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये पुन्हा व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले.
- त्यांच्या भगिनी आशा भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर लतादिदींच्या प्रकृतीविषयी माहिता बाहेर पसरली.
पंतप्रधान मोदींच्या संदेशासह केंद्रीय मंत्री पियूश गोयल रुग्णालयात
लता मंगेशकर यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयलही रुग्णालयात पोहोचले होते. रुग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आम्ही आणि संपूर्ण देश लतादीदींसाठी प्रार्थना करत आहोत. लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि त्यांना येथून घरी घेऊन जावे, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्या, असा संदेश दिला आहे. मी कुटुंबीयांना पंतप्रधानांचा संदेश दिला आहे. आम्ही सर्व काळजी करत आहोत. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो.”
आशा भोसले शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. लता मंगेशकर आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होत्या. अशा स्थितीत आशा भोसले यांनी त्यांना दुरून पाहिले. त्यांनी डॉक्टरांच्या टीमशी चर्चा केली. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर आशा भोसले म्हणाल्या, ‘डॉक्टरांनी मला सांगितले आहे की लता दीदींची प्रकृती आता स्थिर आहे.’ अर्थातच डॉक्टरांचे आशा भोसलेंसारखे कुटुंबिय, कोट्यवधी संगीत रसिक या साऱ्यांची दिदींच्या प्रकृती सुधारण्याची इच्छा खूपच प्रबळ होती. पण अखेर इच्छा नसतानाही मैफिल संपते तसं झालं.
शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात चौकशी केली होती.
हेही वाचा:
आधी कधीही नव्हती, भविष्यातही नसणारच…गानकोकिळा स्वरलता!