मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीची सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. गावागावांचे निकाल वेगाने पुढे येत आहेत. राज्यभरात जाहीर झालेल्या निकालांमध्ये सध्या स्थानिक आघाड्यांचा एक हजार पेक्षा जास्त जागी विजय झाला आहे. सध्या शिवसेनेला मागे टाकत भाजपने पहिले स्थान पटकावले आहे. तर शिवसेना दुसऱ्या आणि राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यामुळे आता भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. तर काँग्रेस चौथ्या जागी आहे. मनसेने आतापर्यंत ३६ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे.
या निवडणुकांसाठी गेल्या शुक्रवारी मतदान झाले होते. अद्याप हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निकाल बाकी असल्याने आता खरी चुरस दिसत आहे.
ग्रामयुद्धात मोठ्या नेत्यांना धक्का
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने तीन जागा मिळवत मुसंडी मारली आहे. भाजप आमदार नितेश राणेंच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत त्यांच्याकडून शिवसेनेने खेचून घेतली आहे. तर राजापुरातील ग्रामपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला आहे.
काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना कराडात धक्का बसला आहे. तिथे भाजपच्या अतुल भोसले यांनी अनेक गावांमध्ये कमळ फुलवले आहे. सोलापूरच्या माळशिरसमध्ये विजय सिंह मोहिते पाटील आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्यात चुरस सुरु आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंच्या बळावर भाजपने शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे केले. अनेक ठिकाणी शिवसेनेला धक्का बसला आहे. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीची चुरस आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतीत माजी सभापती राजू परब यांचा करिष्मा चालला आहे. सात जागांवर विजय मिळवत भाजपाने सत्ता मिळवली आहे.
साताऱ्यातील पाटणमध्ये शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी भगवा फडकवला असून तिथे राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला फटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सासुरवाडीचे गाव असणाऱ्या सांगलीतील म्हैसाळ गावात राष्ट्रवादीचे घड्याळ चालले नाही. पाटील यांचे मेव्हणे राऊळे उभे असलेल्या पॅनलचा धुव्वा उडवत भाजपनं बाजी मारली आहे.