मुक्तपीठ टीम
“पदवीधर मतदारसंघातील भाजपचा पराभव हा सत्तेचा दुरुपयोग करून घडवून आणण्यात आलेला आहे. बोगस मतदार आणि मतदान यांचा गैरवापर करत तिथे सत्ताधारी पक्षांनी विजय मिळवला, भाजपचा पराभव घडवला.” असा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला आहे. येणाऱ्या दोन दिवसात आपण पुराव्यांसह पदवीधर मतदारसंघातील मतदार आणि मतदान घोटाळ्याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे पाटील यांनी आज जाहीर केले.
चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारा हा गौप्यस्फोट ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपच्या यशाचा दावा करण्यासाठी होती. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांनी पदवीधर मतदारसंघांमधील भाजपच्या पराभवावर भाष्य करताना थेट सत्ताधारी आघाडीतील पक्षांवरच घोटाळ्याचा आरोप केला. खरेतर पाटील यांनी स्वत:च सांगितल्याप्रमाणे ते दोन दिवसात या कथित घोटाळ्यावर पुराव्यासह गौप्यस्फोट करणार आहेत. पण त्यांनी आजच काही गोष्टी उघड करून दोन दिवसांनंतरच्या गौप्यस्फोटाचा प्रोमो चालवला आहे.
पाटील यांनी केलेल्या आरोपांनुसार, “पदवीधर मतदार संघात अनेक संशयास्पद गोष्टी घडल्याचे आता उघड होत आहे. अढीच हजार मतदान पत्रिका कोऱ्या सापडल्याचेही त्यांनी सांगितले. पदवीधर मतदारसंघातील मतदार हा किमान पदवीधर असलाच पाहिजे, असा नियम आहे. पण यावेळी मतदार नोंदणीत ज्यांची शैक्षणिक पात्रता त्यापेक्षा कमी होती, त्यांनाही मतदार म्हणून नोंदवण्यात आले. एवढेच नाही तर एकच नाव मतदार यादीत अनेकवेळा आले आहे. त्या मतदाराने तेवढ्यांदा मतदानही केले आहे.”
दोन दिवसात चंद्रकांत पाटील हे पदवीधर मतदारसंघ घोटाळा पुराव्यासह मांडणार आहेत. तसेच याबद्दल निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.