मुक्तपीठ टीम
भारतात सोशल मीडिया कंपन्यांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलींनुसार गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅपसह काही सोशल मीडिया कंपन्यांनी आवश्यक त्या अधिकाऱ्यांची नावे केंद्र सरकारला कळवली आहेत. या कंपन्यांनी आपले मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल संपर्क अधिकारी आणि निवासी तक्रार निवारण अधिकारी यांच्या नियुक्तीबद्दल सरकारला माहिती दिली आहे. मात्र, ट्विटरने आतापर्यंत केवळ आपल्या वकीलाचे नाव कळवले आहे. मुख्य अनुपालन अधिकाऱ्यांचे नाव अद्याप कळवलेले नाही. त्यामुळे सध्या केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय पावलं उचलतं, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारच्या नव्या नियमावलीनुसार काय घडले?
• आतापर्यंत गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, कु, शेअरचॅट, टेलिग्राम आणि लिंक्डइन यांनी सरकारच्या नवीन धोरणानुसार आवश्यक ती संपूर्ण माहिती पाठविली आहे.
• ट्विटरनेही सरकारनं नाराजी व्यक्त केल्यानंतर रात्री उशिरा त्याच्या फर्ममध्ये काम करणाऱ्या वकिलाची माहिती कळवलली आहे.
• ट्विटरसोबत काम करणारे हे वकीलच त्यांचे भारतात नोडल संपर्क अधिकारी आणि तक्रार अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
• परंतु ट्विटरने आपल्या मुख्य अनुपालन अधिकाऱ्याबद्दल अद्याप सरकारला कळवलेले नाही.
सरकारने ट्विटरला फटकारले
• ट्विटरद्वारे जारी केलेल्या निवेदनात, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
• सरकारने नव्या सोशल मीडिया नवीन नियमावलीचे पालन न केल्याबद्दल ट्विटरला फटकारले.
• त्यावर सरकारने निवेदन जारी करून ट्विटरला कठोर शब्दात फटकारले
• भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे, असे बजावले.
• तसेच ही नियमावली कोणत्याही खासगी अथवा परदेशी कंपनीच्या फायद्यासाठी नसल्याचेही त्यांना बजावण्यात आले.
मार्गदर्शक तत्त्वांबाबत सरकारची कठोर भूमिका
• सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी २५ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.
• या मार्गदर्शक तत्वांना अंमलात आणण्यासाठी ३ महिन्यांचा अवधी दिला. मंगळवारी २५ मे रोजी ही मुदत संपुष्टात आली.
• यानंतरही ट्विटर आणि फेसबुकसारख्या कंपन्या सरकारशी सामना करण्याच्या भूमिकेत होत्या.
• परंतु केंद्र सरकारने थोडीही नरमाई न दाखवता कठोर भूमिका घेतली. त्यामुळे त्यांनीही सरकारला माहिती कळवली.
• आता मात्र इतर कंपन्यांनी नियमांनुसार सर्व नावे कळवली असताना, ट्विटरने फक्त एकच नाव कळवल्याने, सरकार नेमकं काय करते, त्यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.