मुक्तपीठ टीम
दूरसंचार विभागाने (DoT) युनिफाइड लायसन्स करारामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार आता मोबाइल आणि इंटरनेट प्रोव्हायडर्स तसेच इतर सर्व मोबाइल परवानाधारकांना लोकांच्या कॉल डेटा रेकॉर्ड दोन वर्षांपर्यंत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक सुरक्षा एजेन्सींच्या विनंतीनंतर ही अतिरिक्त वेळ वाढवण्यात आली आहे. सध्या कॉल रेकॉर्ड डेटा १८ महिन्यांसाठी म्हणजे दीड वर्षांसाठी राखला केला जातो.
दूरसंचार विभागाने २१ डिसेंबर रोजी अधिसूचनेद्वारे सर्व कॉल तपशील रेकॉर्ड, एक्सचेंज तपशील रेकॉर्ड आणि नेटवर्क कम्युनिकेशन आयपी रेकॉर्ड दोन वर्षांसाठी जतन करण्यास सांगितले आहे. हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. अधिसूचनेत असे म्हटले आहे की इंटरनेट सेवा प्रदात्यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य आयपी तपशील रेकॉर्ड व्यतिरिक्त “इंटरनेट टेलिफोनी” तपशील देखील राखून ठेवावे लागतील.
या आदेशावर दूरसंचार कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हाही असा डेटा काढून टाकला जातो, त्याआधी त्या डेटाशी संबंधित कार्यालय आणि अधिकारी दोघांनाही माहिती दिली जाते. माहिती दिल्यानंतर पुढील ४५ दिवसांनंतर डेटा हटवला जातो.
दूरसंचार कंपनीच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा डेटा दोन वर्षांसाठी ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही, कारण हा डेटा मजकूर स्वरूपात संग्रहित केला जातो, त्यामुळे जास्त जागेची आवश्यकता नाही. यातील बहुतांश डेटामध्ये कॉल कोणी केला आणि कॉलचा कालावधी किती होता याची माहिती असते.