मुक्तपीठ टीम
गेल्या २५ दिवसांत गॅस सिलिंडरच्या किंमतीत सरकारने १२५ रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सिलिंडरची किंमत ५२० रुपये होती. सिलिंडरच्या सध्याच्या किंमतीमधून ते कमी केले तर साधारण ग्राहकांना सुमारे ३०३ रुपयांचे अनुदान मिळायला हवे. असे झाल्यास सिलिंडर ग्राहकांना ८२३ ऐवजी ५२० रुपयांनाच पडेलं. यावरून असे लक्षात येते की, सरकार प्रत्येक सिलिंडरमागे एकूण ३०३ रुपये आपल्या तिजोरीत जमा करून घेत आहे.
महिन्याच्या सुरुवातीलाच (१ मार्च) घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेले चार दिवसात दुसऱ्यांदा २५ रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीवर सरकाराचा तर्क आहे की, “आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळेच गेल्या चार दिवसात घरगुती सिलिंडरचे दर दुसऱ्यांदा वाढविले आहेत”. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी पार करत आहेत. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ
- तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत २५ रुपयांनी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ९५ रुपयांची वाढ केली.
- आता घरगुती गॅसची किंमत ८२३ रुपयांवर, तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत १६२५ रुपयांवर गेली आहे.
- कोरोना कालावधीत सिलिंडरवरील अनुदान बंद करण्यात आले.
- त्यामुळे सरकार एका महिन्यात घरगुती गॅसवरील अनुदानावरून ३.३९ अब्ज रुपयांची कमाई करत आहे.
- घरगुती गॅसवरही ५% जीएसटी आहे. त्यातूनही दरमहा सरकारला ४४ कोटी रुपये उत्पन्न मिळते.
- व्यावसायिक सिलिंडरवरही सरकार १८% सबसिडी घेते.
दर वाढीचा राज्यांनाही होतोय फायदा
- सिलिंडरवर लावण्यात येणाऱ्या जीएसटीच्या उत्पन्नाच्या निम्म्या पैशात राज्यांचा वाटा असतो.
- सिलिंडरच्या किंमती वाढल्या की त्याचा फायदा राज्यांनाही होतो.
- सरकारने अलीकडेच गॅसच्या किंमती ४ फेब्रुवारीला २५ रुपये, १४ फेब्रुवारीला ५० रुपये, २५ फेब्रुवारीला २५ रुपये आणि आता १ मार्च रोजी किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यातील किंमतींवर नजर
- १ डिसेंबर २०२० च्या आकडेवारीवर नजर टाकली तर घरगुती गॅसची किंमत ६४८ रुपये होती, तर व्यावसायिक सिलिंडरचे दर १३०७ रुपये होता.
- १५ डिसेंबर रोजी सरकारने किंमती वाढवल्या. तेव्हा घरगुती गॅसची किंमत ६९८ रुपये होते. तर व्यावसायिक गॅसची किंमत १३४३.५० रुपयांवर पोहोचली होती.
- १५ जानेवारी रोजी, जेथे घरगुती गॅसची किंमक ६९८ रुपये होते, तर व्यावसायिक गॅसची किंमत १५५० रुपये होती.