मुक्तपीठ टीम
लाखो रेल्वे प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून प्रवेश करण्यापूर्वी तिकिट खरेदी न करणाऱ्या हजारो फुकट्या प्रवाशांमुळेच मध्य रेल्वेच्या तिजोरीत १९३ कोटी ६२ लाख रुपयांचा दंडात्मक स्वरुपातील महसूल जमा झाला आहे. यामध्ये मुंबई विभागातील ४ आणि अन्य ३ विभागांतील तपासनीसांनीही कर्तव्य बजावल्यामुळे कोट्यवधींचा महसूल मिळाला. अशा विनातिकीट/अनियमित प्रवासातून मिळालेला १९३ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल एप्रिल-आॅक्टोबर २०२२ या कालावधीत नोंदवला गेला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ९३.२९ कोटींची नोंद झाली होती. त्यात १०७.५४% ची वाढ झाली आहे.
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते. विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणा-या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
एप्रिल-आॅक्टोबर २०२२ दरम्यान, विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २९.०३ लाख प्रकरणे आढळली. गतवर्षीच्या याच कालावधीत १६.१६ लाख प्रकरणे होती. यामध्ये ७९.४६% ची वाढ दिसून येत आहे. आॅक्टोबर २०२२ या महिन्यात, विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या व बुक न केलेल्या सामानासह ४.४४ लाख प्रकरणांद्वारे मध्य रेल्वेने ३०.३५ कोटींचा महसूल नोंदविला. याकरीता मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट आळा घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात तिकीट तपासणी कर्मचा-यांपैकी चार जणांनी एक कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा करून उत्कृष्ट कामगिरी दाखवली. मुंबई मुख्यालयतील डी. कुमार (टीटीआय) यांनी १५.०५३ प्रकरणांमधून १.४३ कोटी रु, मुख्यालयातील एस. बी. गलांडे यांनी १४,८३७ प्रकरणांमधून १३.४ कोटी रु, टीटीआय एच. ए. वाघ (मुख्यालय) यांनी ११,६३४ प्रकरणांमधून १.०४ कोटी रु, श्री टीटीआय, मुंबई विभागातील सुनील डी. नैनानी यांनीही १२,१३७ प्रकरणांमधून १.०३ कोटी रुपये महसूल मिळवून दिला.
भुसावळ विभागातील मुख्य तिकीट परीक्षक के.के.पटेल यांनी ११,३३६ प्रकरणांमधून ९९.२३ लाख रुपये, याच विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक विनय ओझा यांनी ११,८१८ प्रकरणांमधून ९३.५४ लाख रु. आणि पुणे विभागातील एकमेव मुख्य तिकीट निरीक्षक एस.एस. क्षीरसागर यांनीदेखील मुख्य तिकीट तब्बल ९,६२३ प्रकरणांमधून ९१.४४ लाख रुपयांचा महसूल मध्य रेल्वेच्या कोषागारात जमा केला.