मुक्तपीठ टीम
चिरंजीवीच्या ‘गॉड फादर’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी चिरंजीवी आणि सलमान खानमध्ये खास बॉन्डिंग पाहायला मिळाले. ट्रेलर लाँचिंगच्या वेळी चिरंजीवीने एका जुन्या घटनेचा संदर्भ देत सांगितले की, एका कार्यक्रमादरम्यान हिंदी सिनेमाला भारतीय सिनेमाचा दर्जा देण्यात आल्याने त्यांना अपमानास्पद वाटले. हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांचा मुलगा राम चरण याने पूर्ण केल्याचे चिरंजीवी सांगतात. ते म्हणतात, प्रत्येक चित्रपट हा ‘प्रादेशिक भाषेऐवजी भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. हे काम एसएस राजामौली यांनी ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’मध्ये केले.
एका जुन्या घटनेचा संदर्भ देत चिरंजीवी म्हणाले, “माझ्या ‘रुद्रवीणा’ चित्रपटाला १९८९ मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठित ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. या वेळी मला एका भिंतीवर भारतीय चित्रपटाचा इतिहास दर्शविणारी चित्रे दिसली. दक्षिण भारतीय अभिनेत्यांमध्ये फक्त जयललिता, एमजीआर आणि प्रेम नझीर यांचा फोटो होता. हे पाहून मला खूप वाईट वाटलं, हा माझ्या अपमानाप्रमाणेच होता. त्यांनी फक्त हिंदी सिनेमा भारतीय सिनेमा म्हणून दाखवला.
हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्याचे स्वप्न मुलाने पूर्ण केले!- चिरंजीवी
- चिरंजीवीला जे ‘स्टारडम आणि यश’ साऊथच्या चित्रपटांमध्ये मिळालं, तितकं यश हिंदी चित्रपटात मिळालं नाही.
- त्यांचा मुलगा रामचरण याचा ‘आरआरआर’ हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड तसेच हिंदी भाषेत प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
- मात्र, याआधी ‘जंजीर’च्या हिंदी रिमेकमध्येही रामचरण फ्लॉप झाला होता.
- चिरंजीवी म्हणतात, ‘हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवण्याचे माझे स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण केले.’
- चिरंजीवीने १९९०मध्ये ‘प्रतिबंध’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी १९९४ मध्ये आलेल्या ‘जंटलमेन’ चित्रपटातही काम केले होते.
प्रत्येक चित्रपट हा प्रादेशिक भाषेऐवजी, भारतीय चित्रपट म्हणून ओळखवा
- चिरंजीवी म्हणतात, “बॉलिवुड किंवा टॉलीवूडमध्ये कोणताही विभक्त न होता सिनेमा हा भारतीय सिनेमा म्हणून जगभरात ओळखला जावा अशी माझी इच्छा आहे.
- १५० हून अधिक चित्रपट केल्यानंतरही मला ‘गॉड फादर’मध्ये काम करताना पूर्वीसारखाच आनंद आणि ऊर्जा जाणवत होती.
- प्रादेशिक किंवा हिंदी चित्रपट नसून भारतीय चित्रपट असावा अशी माझी नेहमीच इच्छा होती.