नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी खार येथे जान्हवी कुकरेजा या तरुणीच्या हत्येची घटना ताजी असतानाच मानसिक नैराश्यातून एका सोळा वर्षांच्या मुलीने तिच्या मैत्रिणीला मोबाईलवरुन आत्महत्येचा मॅसेज पाठवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खार परिसरात उघडकीस आली आहे. ही मुलगी सोळा वर्षांची असल्याने तिचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला, तिच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे तिने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांची जबानी नोंदवून खार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान या मुलीच्या आत्महत्येने खार परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे.
मंगळवार ५ जानेवारीला सायंकाळी लिलावती रुग्णालयातून खार पोलिसांना एक माहिती प्राप्त झाली होती, त्यात एक सोळा वर्षांची मुलगी तिच्या राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन पडून जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु होते, उपचारादरम्यान सायंकाळी पावणेसहा वाजता तिचा मृत्यू झाला. या माहितीनंतर खार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती, घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना ही सोळा वर्षांची मुलगी खार येथील सोळावा रस्ता, पाली पाल्म इमारतीच्या फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये राहत असल्याचे समजले, तिचे आई-वडिल आणि तीन भावडांसोबत ती राहत होती. २ जानेवारीला ते सर्वजण लोणावळा येथे सुट्टीसाठी गेले होते, ३ जानेवारीला त्यांची सोळा वर्षांची मुलगी मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने लोणावळा येथे दुसर्या ठिकाणी गेली होती, सोमवारी ४ जानेवारीला ते सर्वजण घरी आले, मात्र ही मुलगी तिथे होती, ती मंगळवारी दुपारी दिड वाजता घरी आली. त्यानंतर ती तिच्या बेडरुममध्ये गेली आणि तेथूनच तिने दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार इमारतीचा सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास येताच त्याने ही माहिती मुलीच्या पालकांना दिली. त्यानंतर त्यांनी तिला लिलावती रुग्णालयात दाखल केले, तिथे तिला सायंकाळी पावणेसहा वाजता मृत घोषित करण्यात आले. ही माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिच्या पालकांची जबानी नोंदविण्यात आली असून या जबानीतून तिच्या आत्महत्येचा कारणाचा उलघडा होऊ शकला नाही.
ही मुलगी लोणावळा येथून आल्यापासून मानसिक तणावात होती, त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे, दरम्यान तिने तिच्या एका मैत्रिणीला मॅसेज करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते, त्यामुळे या मैत्रिणीसह लोणावळा येथे तिला भेटलेल्या सर्व मित्रांची आता पोलिसांकडून चौकशी होणार आहे, या चौकशीनंतरच तिच्या आत्महत्येमागील कारणचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी खार येथे जान्हवी कुकरेजा या तरुणीची हत्या झाली होती, या हत्येप्रकरणी तिच्याच दोन मित्रांना खार पोलिसांनी अटक केली होती, या घटनेला आता पाच दिवस उलटत नाही तोवर अन्य एका मुलीने तिच्या राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.