ये नववर्षा ये,
बालपण जपत ये, फुलवत ये,
बालपणीची निरागसता घेऊन ये.
या निरागसतेत असूदे
निर्मळ – निरपेक्ष मैत्रीची ओढ.
बालपणीची उत्सुकताही घेऊन ये
म्हणजे इतरांचीही थोरवी
जाणण्याची जिज्ञासा असेल.
अरे नववर्षा,
नाविन्याची ओढ घेऊन ये,
म्हणजे कूपमंडुकता निघून जाईल.
निरागसतेतील धारिष्ट्यही हवे आहे,
जे असत्याला सत्य प्रश्न विचारेल.
निस्पृहता तू आणशीलच,
म्हणजे ‘गुंड’ साधू – मौलवींना
दंड करता येईल.
हे नववर्षा,
फुलपाखराचा, गायीच्या वासराचा,
हरणाच्या पाडसाचा
अवखळपणा घेऊन ये –
म्हणजे गोंडस आनंदाने
मन उचंबळत राहील सातत्याने.
आनंदी मनात अंधश्रद्धा नसतील
नि ‘नाग’बळी नाही जाणार कुणाचा !
अरे नववर्षा,
घेऊन ये भरभरून
बालकाची असिमित ऊर्जा !
ही ऊर्जा वाटूयात शेतकऱ्यांना,
भूमीहिनांना, कष्टकऱ्यांना,
दुर्बळांना नि महिलांना.
ही ऊर्जावान मंडळी मागतील
मग आपले हक्क ठामपणाने.
हे नववर्षा,
सोबतीने आण बालकांचा
पारदर्शक प्रामाणिकपणा,
म्हणजे बोगस दाव्यांना
खोडता येईल निष्ठूरपणे.
आण बालकांचा आग्रह –
ज्याने कथा ‘खऱ्या’ नायकांच्या
ऐकण्याचा हट्ट करता येईल !
अरे नववर्षा,
आजीची बाळगुटी आण,
जी बाळाला गुटगुटीत बनवायची.
निस्तेज – निराश समाजाला
देऊयात ही बाळगुटी.
आजीचं घड्याळही आण रे –
काळ – वेळ प्रगतीचा
हल्ली कळतच नाही !
हवंय रे बालपण नववर्षा !!
– डॉ. गिरीश जाखोटिया.
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.