मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस येत्या १७ सप्टेंबर रोजी आहे. दरवर्षी यादिवशी अनेक कार्यक्रम राबवले जातात. यावर्षी देखील वाढदिवसानिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान, खेळाडू आणि राज्यातील नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांना मिळालेल्या १२०० हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना महालक्ष्मीची मूर्ती भेट दिली. यासह अनेक राजकीय नेत्यांनीही अशा भेटवस्तू दिल्या आहेत. यातून जमा होणारा पैसा नमामि गंगे प्रकल्पासाठी दान करण्यात येणार असल्याचे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
ऑनलाइन लिलावात सहभागी होण्यासाठी काय करावे?
- या ऑनलाइन लिलावात कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो.
- यासाठी PM Momentos वेब पोर्टल pmmementos.gov.in वर लॉग इन करा.
- मोदींच्या वाढदिवसापासून सुरू होणारा हा लिलाव २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरू राहणार आहे.
- लिलाव झालेल्या भेटवस्तूंची किंमत १०० ते १० लाख रुपयांपर्यंत आहे.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा लिलाव मागील ४ वर्षांपासून होत आहे. हा लिलाव दरवर्षी १७ सप्टेंबरपासून सुरू होतो. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव केला जातो. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे संचालक टेमसुनारो जमीर यांनी सांगितले की, पदक विजेत्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट, बॉक्सिंग ग्लोव्हज, भाला आणि रॅकेट इत्यादींचा विशेष संग्रह देखील या ई-लिलावात असेल.
लिलावात कोण-कोणत्या भेटवस्तूंचा समावेश करण्यात आला आहे?
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटवस्तू मान्यवरांपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत मिळतात.
- या भेटवस्तूंमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिलेली राणी कमलापतीची एक हनुमान मूर्ती आहे.
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेले एक सूर्य पेंटिंग आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी भेट दिलेले त्रिशूल देखील लिलाव पोर्टलवर आहे.
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्ती सादर केली होती, तिचाही लिलाव होणार आहे.
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी भेट दिलेली भगवान व्यंकटेश्वराची मूर्तीही यात आहे.
- याशिवाय उत्कृष्ट चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृतीही खरेदी करता येतात. त्यांनी सांगितले की या लिलावात अनेक स्मरणीय वस्तू देखील आहेत ज्या खरेदी करता येतील.
- येथे श्री राम मंदिराचे मॉडेल, प्रतिकृती आणि वाराणसीत बांधलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचे मॉडेलही खरेदी करता येईल.