मुक्तपीठ टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं आता पुढे काय होणार, हा प्रश्न पोलीस वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे. आज सर्वोच्च न्यायालयानं त्यांना मोठा धक्का दिला आहे. परमबीर सिंह यांनी केलेली महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी फेटाळली गेल्याने आता त्यांच्याविरोधातील प्रकरणांची चौकशी सुरु होईल. त्यामुळे त्यांची वाटचाल आता आरोपकर्त्यापासून आरोपीपर्यंतची झाली आहे. परमबीरांच्या १०० कोटींच्या महावसुली आरोप बॉम्बमुळे ज्यांना राजकीय फायदा झाला ते भाजपा नेते आता काही मदत करतील का, यावरही परमबीरांचे भविष्य ठरणार आहे.
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालायत न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली. परमबीर सिंह यांच्या बाजूनं ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.
सर्वोच्च न्यायालयानं काय सुनावलं?
- तुम्ही ३० वर्षे महाराष्ट्र कॅडरमध्ये आहात. आताही तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्ही महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास राहिला नाही का? तुमची मागणी धक्कादायक आहे.
- तुम्हाला फौजदारी कायद्याचे ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर आम्ही स्थगिती द्यावी का?
- आम्ही सर्व एफआयरबद्दल बोलत नाही. एफआयआरसाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जा.
- जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नयेत!
आता परमबीरांचे पुढे काय होणार?
- सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना मुंबई न्यायालयाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.
- त्यानुसार त्यांना मुंबई उच्च न्यायालयात आणि एफआयआरप्रकरणी त्या त्या दंडाधिकारी न्यायालयांकडे जावे लागेल.
- सर्वोच्च न्यायालयाने “जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नयेत”! असं बजावलं आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे की परमबीर स्वत:वरच आरोप होऊ शकतील अशी परिस्थिती असताना त्यांनी इतरांवर आरोप करताना विचार करणे आवश्यक होते.
- आता महाराष्ट्र पोलीस त्यांच्याविरोधात पोलीस अधिकारी, बिल्डर आणि अन्य काहींनी दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी तपास करु शकतील.
- त्या आरोपांमध्ये तथ्य आढळले, पुरावे सापडले तर परमबीर सिंह यांच्याविरोधात अटकेची कारवाई होऊ शकेल.
परमबीर राजकीय मदतीसाठी प्रयत्न करतील
- जर कनिष्ठ न्यायालयांकडून दिलासा मिळाला नाही तर परमबीर राजकीय मदतीसाठी प्रयत्न करत असतील.
- त्यांच्या आरोपांच्या गदारोळामुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे भाजपाचा राजकीय फायदा झाला.
- पण आता भाजपा नेते किती मदत करतील, यावर बरंच काही अवलंबून आहे.
- भाजपाचे नेते दत्ता मेघे त्यांचे नातेवाईक आहेत, पण सध्याच्या राजकारणात त्यांचे किती प्रस्थ आहे, त्यावरही त्यांची सुटका अवलंबून असेल.
- परमबीरांनी एकीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी तर दुसरीकडे त्याआधी पदावर असताना भाजपात वजन असणाऱ्या अर्णब गोस्वामींना दुखावून ठेवले आहे.
- त्यामुळे गृहमंत्र्यांसारखे मोठे लक्ष्य सर झाल्यानंतर आता पुन्हा भाजपा परमबीरांना किती साथ देते हा प्रश्नच आहे.