मुक्तपीठ टीम
सांगली जिल्ह्यात गुरुवारी उशिरा रात्री ऊस वाहतूक करणारे राजारामबापू, क्रांती या साखर कारखान्यांचे ट्रक्टर पेटवण्यात आले, तर विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झाला यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील एकरकमी एफआरपीचे आंदोलन अधिकच चिघळलेलं दिसत आहे. राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा मंत्री जयंत पाटील आहेत क्रांती कारखान्याचे आमदार अरुण लाड तर विश्वास कारखान्याचे आमदार मानसिंग नाईक अध्यक्ष आहेत. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
या ठिकाणी पेटवण्यात आले ट्रक्टर
- राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे पेटविण्यात आला.
- तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बळवडी फाटा येथे रात्री उशिरा पेटविण्यात आला.
- तसेच विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडी येथेच पेटविण्याचा प्रयत्न झाला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफ आर् पी मिळावी अशी मागणी केली आहे.या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केली आहे, तर अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत मात्र राजारामबापू, क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत त्यामुळेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत.बुधवारी राजाराम बापू कारखान्याच्या ३५ वाहनाची हवा सोडण्यात आली. यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठे फाटा, कडेगा व तालुक्यात रामपूर फाटा याठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली आहे.
याच प्रश्नावर जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दोन वेळा मोटरसायकल सर्व कारखान्यावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे, तरीही एक रकमी एफ आर पी जाहीर होत नाही त्यामुळे आंदोलन हिंसक वळनावर पोहचले आहे. आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला जे जमते ते सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना का जमत नाही. दोन्ही जिल्ह्यात किती अंतर आहे. त्या ठिकाणी सहकारी आणि खासगी अशा दोन्ही कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केली, तर सांगली जिल्ह्यात केवळ खाजगी दोन कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केली आहे. दत्त इंडिया आणि दालमिया हे दोन्ही कारखाने केवळ पाच वर्षे चालविले जात आहेत सहकारातील १५ ते २५ वर्षे सुरू असलेले कारखाने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आणि शेतकरी संतप्त झाले आहेत त्यातूनच पेटवा पेटवी सुरू आहे. आमचे कार्यकर्ते ना इलाजाने हे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा अंत न बघता तात्काळ एक रकमी एफ आर पी जाहीर करावी.