मुक्तपीठ टीम
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही नेहमीच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम आणि आरोग्यविषयक उपक्रम असे वेगवेगळे उपक्रम जिजाऊद्वारे राबवले जातात. आताही हे उपक्रम राबवणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या पुढाकारातून एक उपक्रम पार पडला. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय विकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. कसारा येथे निलेश भगवान सांबरे संचलित जिजाऊ संघटना कसारा तसेच एसएमबीटी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत हृदय रोग तपासणी शिबीराचे करण्यात आले होते.
कसारा येथे आणि तेथील आसपासच्या परिसरात शैक्षणिक व सामाजिक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचा दोनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरात तपासण्यात आलेल्या रुग्णांपैकी २२ रुग्णांवर पुढील उपचार मोफत केले जाणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. जिजाऊ संस्थेकडून नेहमीच शरीराची आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच लोकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
हे शिबीर एसएमबीटी हॉस्पिटल व जिजाऊ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. जीवक हॉस्पिटल येथे राबवण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या महिला अध्यक्षा मोनिका पानवे यांनी केले. डॉ. भूषण गवळे आणि डॉ. सोहम चौधरी यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. तसेच, या शिबिरासाठी माजी जि.प. सदस्य जयराम बेंडकुळे, माजी उपसरपंच रमेश भोईर, शरद वेखंडे, पोलीस पाटील पांडुरंग भोईर, विभागीय गवळे व अध्यक्ष महेंद्र शिंदे, सोमा कांबडी हे सर्व उपस्थित होते.