मुक्तपीठ टीम
क्षयरोगाचे निदान होण्यासाठी खात्रीशीर व योग्य निकाल देणारे ३८ वे सीबीनॅट हे चाचणी संयंत्र आता शीव येथील के. जे. सोमय्या रुग्णालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि सोमय्या रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या या उपक्रमात विनामूल्य क्षयरोग निदान चाचणी केली जाणार आहे.
या संयुक्त उपक्रमामध्ये महानगरपालिकेने सीबीनॅट संयंत्र पुरविले असून रुग्णांच्या चाचणीसाठी लागणारे साहित्य (कीट) देखील महानगरपालिका पुरविणार आहे. तर सोमय्या रुग्णालयाने सीबीनॅट संयंत्रासाठी जागा दिली असून त्यात अनुरुप बदलदेखील रुग्णालयानेच केले आहेत. त्यासोबत क्षयरोग चाचणीसाठी रुग्णालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागातील आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे. सदर केंद्रामध्ये क्षयरोग निदान चाचणी करुन घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
यावेळी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण महानगरात चाचणी सुविधा सातत्याने वाढवल्या जात आहेत. सोमय्या रुग्णालयात सीबीनॅट संयंत्र उपलब्ध करुन दिल्याने शीव, चुनाभट्टी आणि चेंबूर परिसरातील नागरिकांना क्षयरोग निदान चाचणीची आवश्यकता भासल्यास त्यांची मोठी सोय होणार आहे. येत्या काही दिवसात ग्रँटरोड परिसरात दवाखान्यातही ३९ वे सीबीनॅट संयंत्र उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सीबीनॅट केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) वर्षा फडके, मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. (श्रीमती) प्रणिता टिपरे यांच्यासह राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम व सोमय्या रुग्णालय यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
संपूर्ण मुंबईत मिळून २०२१ मध्ये १ लाख १८ हजार चाचण्या
दरम्यान, संपूर्ण मुंबईत महानगरातील सर्व सीबीनॅट संयंत्र मिळून सन २०२१ मध्ये १ लाख १८ हजार ०८६ इतक्या क्षयरोग निदान चाचण्या करण्यात आल्या. सन २०१३ मध्ये सर्वप्रथम धारावी येथे सीबीनॅट संयंत्र उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यावेळी एका वर्षात १६ हजार ०८९ क्षयरोग निदान चाचण्या झाल्या होत्या. याचाच अर्थ मागील ८ वर्षांत सीबीनॅट संयंत्रांची टप्प्याटप्प्याने संख्या वाढवून चाचण्यांची संख्यादेखील वाढली आहे. सन २०१३ ते सन २०२१ अखेरपर्यंत विचार करता एकूण ६ लाख १८ हजार ८३१ चाचण्या सीबीनॅटद्वारे करण्यात आल्या आहेत. अवघ्या २ तासांमध्ये क्षयरोग निदान आणि क्षयरोग असल्यास त्याचा प्रकार हे दोन्ही निष्कर्ष देण्याची क्षमता असलेल्या सीबीनॅट संयंत्रांमुळे तातडीने क्षय रूग्णाची थुंकीची चाचणी करून लवकरात लवकर योग्य उपचार सुरू करणे, या बाबी शक्य होतात. महानगरपालिकेच्या या प्रयत्नांमुळे क्षयरोग मुक्त मुंबई करण्याच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होत आहे.