मुक्तपीठ टीम
गरजू बेरोजगार तरुणांची विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी सहाजणांना पोलिसांनी मालाड परिसरातून अटक केली असून ते सर्वजण कोलकाताचे रहिवाशी आहेत. बोगस एम्लॉयमेंट, कॉन्ट्रक्ट लेटर आणि व्हिसा देऊन या टोळीने आतापर्यंत अनेक तरुणांकडून लाखो रुपये उकाळल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अब्दुल हसीम शेख अजादुल इस्लाम, शेख मैनूउद्दीन शेख मुसरुउद्दीन, सफोरिद शेख शमशुद्दीन शेख, मोईनउद्दीन गल्दार अमिनोउद्दीन गल्दार, जयंतकुमार पंचनान मंडल आणि तारक मनोरंजन मंडल अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्यांना सोमवार १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४१ भारतीय पासपोर्ट, विदेशातील कंपनीचे बोगस एम्लॉयमेंट कॉन्ट्रक्ट लेटर, व्हिजा आणि पासपोर्टच्या झेरॉक्स प्रती, दोन लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजीव गावडे यांनी सांगितले.
मुंबई शहरात बेरोजगार तरुणांना विदेशात नोकर्या देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणार्या काही टोळ्या सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती, या टोळ्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना दिले होते, या आदेशानंतर पोलिसांनी अशा टोळ्याविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली होती, याच दरम्यान मालाड येथील एव्हरशाईन मॉलमधील मुंबई श्री कन्सल्टंन्सी या कार्यालयात विदेशात नोकरीचे आमिष दाखवून काही तरुणांची फसवणूक केली जाते, या तरुणांना विदेशी कंपनीचे बोगस कॉल लेटर, व्हिसा देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना मिळाली होती.
या माहितीनंतर सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक संजीव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड, दिपक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, प्रथमेश विचारे, लक्ष्मीकांत शेलकर, पोलीस उपनिरीक्षक अमीत देवकर, लक्ष्मण वडरे, पोलीस हवालदार दिपक आणेराव, सचिन सुतार, महिला पोलीस नाईक अनिता सिंह व अन्य पोलीस पथकाने एव्हरशाईन मॉलच्या मुंबई श्री कन्सलटन्सी कार्यालयात छापा टाकला होता, या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिथे सहाही आरोपी सापडले, एक आरोपी केबीनमध्ये होता, तो स्वतला कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगत होता.
विदेशात नोकरीसाठी आवश्यक असलेले परवान्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे अशा प्रकारे कोणताही परवाना नव्हता. त्यांच्या चौकशीत ते सर्वजण गरजू बेरोजगार तरुणांना संपर्क साधून त्यांना त्यांच्या कार्यालयात नोकरीसाठी बोलवत होते. रशियाच्या दोन नामांकित कंपन्यामध्ये विविध पदावर नोकर्या आहेत, तिथे त्यांना चांगला पगार मिळेल असे सांगितले जात होते. त्यानंतर त्यांना बोगस कॉल लेटर, बोगस व्हिसा आणि इतर कागदपत्रे देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी ऐंशी हजार ते एक लाख रुपये घेतले जात होते. या आरोपींकडून पोलिसांनी ४१ पासपोर्ट, दोन लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त केले आहेत.
या टोळीने मालाडमध्ये प्लेसमेंट कार्यालय थाटून अनेक बेरोजगार तरुणांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातला आहे. त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत तीस लाख रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे, मात्र ही फसवणुक कोट्यवधी रुपयांची असल्याचे पोलीस सांगतात. या सहाजणांविरुद्ध नंतर बांगुरनगर पोलीस ठाण्यात ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. सध्या ते सर्वजण पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या टोळीने आतापर्यंत किती तरुणांची फसवणुक केली आहे, त्यांच्याकडून नोकरीच्या नावाने किती रुपये घेतले आहेत, बोगस कागदपत्रे त्यांना कोणी बनवून दिले, या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग आहे का याचा आता तपास सुरु असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजीव गावडे यांनी सांगितले.