मुक्तपीठ टीम
शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र या सत्ताबदलानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्याचवेळी मंत्रीपदाची इच्छा असणाऱ्यांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी आमदार प्रयत्न करत आहेत. अशातच महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री मिळवून देण्यासाठी दोन आमदारांना आमिष दाखवत १०० कोटींची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी ४ भामट्यांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांनी आणखीही काही आमदारांना गंडा घातल्याची शक्यता आहे.
या चार जणांच्या टोळीकडून १०० कोटींच्या बदल्यात मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी यासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना माहिती दिली होती. त्याआधारे खंडणीविरोधी पथकाने ओबेरॉय हॉटेलमध्ये कुल आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासमोरच सापळा लावून ही कारवाई केली. राहुल कुल यांच्या स्वीय सचिवाच्या तक्रारीवरून मुंबई गुन्हे शाखेने रियाझ शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी या चार आरोपींना अटक केली आहे. अधिवक्ता अजय उमापती दुबे यांनी सांगितले की, किल्ला न्यायालयाने सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे. तक्रारीनुसार आमदाराला कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
१७ जुलै रोजी रियाज शेख याने राहुल कुल यांच्या स्वीय सचिवाला अनेकवेळा फोन केला असून आमदारसाहेबांशी बोलणे झाले असून, खास त्यांच्या कामासाठी दिल्लीहून मुंबईत आलो आहे, असे त्याने सांगितले. स्वीय सचिवांनी हा निरोप कुल यांना दिला. त्यावर चार दिवसांपूर्वी आपणासही या व्यक्तीचा फोन आला होता व मंत्रीपदासाठी १०० कोटी रुपये मागत होता, असे ते म्हणाले. कुल यांनी स्वीय सचिवाला या व्यक्तीला भेटण्यासाठी बोलाविण्यास सांगितले. या दिवशी कुल यांनी रियाजसोबत जवळपास दीड तास चर्चा करून ही रक्कम १००वरून ९० कोटी रुपयांवर आणली. त्यावर २० टक्के म्हणजे १८ कोटी रुपये काम होण्याआधी द्यावे लागतील, अशी अट रियाज याने ठेवली. कुल यांनी ती मान्य करून दुसऱ्या दिवशी पैसे घेण्यासाठी बोलावले. रियाजला १८ जुलै रोजी दुपारी १.१५ वाजता नरिमन पॉइंट येथे बोलावण्यात आले आणि मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाला माहिती देण्यात आली. रियाझ तिथे पोहोचल्यावर कुल यांनी त्याला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले. साध्या गणवेशातील गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले आणि रियाजला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता उर्वरित आरोपींची नावे पुढे आली.
रियाजने गुन्हे शाखेला सांगितले की, योगेशने त्याची सागरशी ओळख करून दिली होती.एका आमदाराला मंत्री बनवण्याचा दर दिल्लीत ५० ते ६० कोटी आहे, असे संगवई म्हणाले होते. योगेशने रियाजकडून आमदाराचा बायोडाटा मागून सागरला व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले होते. सागरने चौकशीत जाफर उस्मानी हा सूत्रधार असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेने त्याला अटकही केली. सर्व आरोपींकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.