मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीच्या संकटामुळे, गेल्या वर्षभरापासून परदेशातून भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी प्रवाशांना व्हिसा देण्याची काम स्थगित ठेवण्यात आले होते. कोरोना महामारीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक निर्बंध घातले होते. कोरोना ग्रस्त परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत असल्याचा विचार करून नंतरच्या काळात परदेशी प्रवाशांना पर्यटक व्हिसाखेरीज इतर कोणत्याही प्रकारच्या भारतीय व्हिसाचा वापर करून भारतात प्रवेश आणि निवासाला परवानगी देण्यात आली.
मात्र, अनेक राज्य सरकारे तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारकांकडून परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास परवानगी देण्यासंबंधीची मागणी केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाकडे केली जात होती. म्हणून मंत्रालयाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय परदेश व्यवहार मंत्रालय, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय तसेच परदेशी पर्यटक ज्या राज्यांमध्ये येतील अशी अपेक्षा आहे त्या राज्यांची सरकारे अशा विविध प्रमुख भागधारकांशी याविषयी विस्तृत चर्चा केली.
या सर्वांकडून मिळालेल्या प्रतिसादांनुसार, केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने चार्टर्ड विमानांनी भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांना १५ ऑक्टोबरपासून नवे पर्यटन व्हिसा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. चार्टर्ड विमानांखेरीज इतर विमानांनी भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी पर्यटकांना १५ नोव्हेंबरपासून नव्याने पर्यटन व्हिसा देण्यात येतील. परदेशी पर्यटक, त्यांना भारतात घेऊन येणाऱ्या विमानांचा कर्मचारी वर्ग आणि इतर भागधारकांना भारतात ज्या विमानतळावर उतरतील तेथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वेळोवेळी सूचित केलेले कोरोना संबंधीचे सर्व प्रमाणित वर्तणुकीचे शिष्टाचार आणि नियम यांचे कडक पालन करावे लागेल
यासह, सध्याची कोरोना बाबतीतील परिस्थिती अशीच राहिली असेल तर, व्हिसा आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या बाबतीत लावण्यात आलेले निर्बंध शिथिल समजण्यात येतील.