मुक्तपीठ टीम
मुंबईसह, उपनगरात मुसळधार पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. मुंबईत दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत एनडीआरएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अंधेरी भुयारी मार्ग बंद
सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडायला लागला. रात्रभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अंधेरी भुयारी मार्गावर पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अंधेरी भुयारी मार्ग सध्या बंद केला आहे. दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल, लोअर परळ, शीव, धारावी, वांद्रे, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, काळाचौकी, दहिसर, बोरिवली, गोरेगाव, सांताक्रूझ यासह अनेक ठिकाणी पाणी साचले.
सरकार आणि यंत्रणा सुसज्ज!
- मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- यानंतर अनेक प्रशासनाने एनडीआरएफच्या पाच तुकड्या येथे उतरवल्या आहेत.
- तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार आणि इतर अधिकाऱ्यांची पावसाच्या परिस्थितीवर बैठक घेतली. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवून नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस!
- राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.
- राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
- एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
- दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.