मुक्तपीठ टीम
परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या मंगळवारी (ता. २७ सप्टेंबर २०२२) सकाळी १० ते २ या वेळेत पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात आयोजित पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात निवड झालेल्या लघुपटाचे स्क्रीनिंग, पर्यटनावरील परिसंवाद आणि बक्षीस वितरण होणार आहे. पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या शुभदा जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती लघुपट महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार यांनी दिली. याप्रसंगी पर्यटन विभागाच्या पल्लवी कुमावत, संयोजन समितीतील अजित शांताराम, सल्लागार पंकज इंगोले आदी उपस्थित होते.
गणेश चप्पलवार म्हणाले, “महोत्सवात लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग, छायाचित्रण या माध्यमातून १३ राज्यातील ७० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्युरींनी परीक्षण करत यातील २५ स्पर्धकांची स्क्रीनिंगकरीता निवड केली असून, त्याचे स्क्रीनिंग यावेळी होईल. पर्यटन व माध्यमांची भूमिका यावरील परिसंवादात ‘एफटीआय’चे माजी अधिष्ठाता अमित त्यागी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले व जेट इंडिया एव्हिएशनच्या शिरीन वस्तानी सहभागी होणार आहेत.”
“बक्षीस वितरणासाठी पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, ‘एफटीआयआय’चे अध्यक्ष शेखर कपूर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, उद्योजक रोहित राठी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्तम माहितीपट, सर्वोत्तम छायाचित्रण, सर्वोत्तम दिग्दर्शक, विशेष जूरी उल्लेख अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. माहितीपट व चित्रपट निर्माते आदित्य शेट, ऐतिहासिक चित्रपट अभ्यासक मोनिया अचारी (जर्मनी), लेखक आणि चित्रपट निर्माते अक्षय इंडीकर, प्रा. वैशाली केंदळे, लेखक आणि दिग्दर्शक जुनेद इमाम, चित्रपट निर्माते अमर देवकर, संजय दानाईत यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले आहे,” असे चप्पलवार यांनी सांगितले.