मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या औरंगाबादमधील जाहीर सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे, अशा बातम्या सर्वच माध्यमांमध्ये सुत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. मनसे नेते आणि औरंगाबाद पोलीस आयुक्तांमध्ये झालेल्या बैठकीत या सभेला अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याचे जाहीर केल्यावर या सभेला परवानगी देणं टाळण्यात येत होतं. आता औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळाली आहे, असं सांगण्यात येत आहे. पण त्यासाठी मनसेला काही नियम-अटी-शर्थीचं पालन करावं लागणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी ‘या’ अटी-शर्थी :
- ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे.
- लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी.
- इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
- सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.
- १ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये.
- व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये.
- वाहन पार्किंगचे नियम पाळावे.
- सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
- सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल.
- सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये.
दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेने राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झाले. १ मे रोजी होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात यासाठी संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. तर राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणारी सभा ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकरांनाही सभा स्थळाची पाहणीसुद्धा केली. तसेच, औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.