मुक्तपीठ टीम
आपल्या लेखनातून सातत्याने पर्यावरण जतन आणि संवर्धनाची भूमिका मांडणारे पर्यावरणप्रेमी पत्रकार, लेखक धीरज वाटेकर यांचा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या पर्यावरण संमेलनात बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे यांच्याहस्ते ‘विशेष सन्मान’ करण्यात आला. हे संमेलन राळेगणसिद्धी येथील ‘हिंद स्वराज ट्रस्ट’च्या सभागृहात ज्येष्ठ समाजसेवक ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, ‘वुई सिटीझन्स’चे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. स्थापत्य अभियंता असलेले धीरज वाटेकर ‘प्रसन्न प्रवास’ नावाने ब्लॉगलेखन करतात. पर्यावरण, पर्यटन, छायाचित्रण आणि चरित्रलेखन हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. पुणे येथील निराली प्रकाशन समूहाचे ते कोकण आणि गोवा प्रतिनिधी आहेत. गेली २४ वर्षे ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी दैनिक लोकसत्ता, दैनिक पुढारी या वृत्तपत्रांकरिता ग्रामीण पत्रकारिता केली आहे. आपल्या आवडीतून वैयक्तिक संदर्भीय कात्रणसंग्रह, संशोधन ग्रंथालय, “परमचिंतन” अभ्यासिका आणि जुन्या वस्तूंचा संग्रह करणाऱ्या वाटेकर यांनी विविध अभ्यासदौरे, गुहांची पाहाणी, पर्यटन अध्ययन, संशोधन, जंगलभ्रमण याकरिता भूतानसह हिमाचल ते कन्याकुमारी-अंदमान प्रवास केलेला आहे. त्यांनी पर्यटन आणि चरित्र लेखन विषयावरील ८ पुस्तकांचे लेखन केले आहे. २००४ साली भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या ‘उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार’सह आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या ‘तेर पॉलिसी सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेकडून ‘प्रकाशाचे बेट’ आदि विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
या पर्यावरण संमेलनाला पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सोलापूर, जळगाव, उस्मानाबाद, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड, लातूर, सांगली येथील प्रतिनिधी उपस्थित होते. वाटेकर यांनी आपले सहकारी विलास महाडिक, ‘वनश्री’ महेंद्र घागरे, सुधाकर शेट्ये यांच्यासह गेल्यावर्षी २२ नोव्हेंबर रोजी राहीबाई पोपेरे यांच्या त्यांच्या अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावी जाऊन भेट घेऊन त्यांच्या बीज बँकेची माहिती समजून घेतली होती.