मुक्तपीठ टीम
अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीत सुमारे १ कोटी ८ लाख ९७ हजार ५२० रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २२ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास आंबाडी -भिवंडी रोडवर नारायण फार्मच्या बाजूला, मडक्याचा पाडा, कवाड, तालुका भिवंडी येथे टाटा आयशर (MH०४-HD-३०२८) टेम्पोची पाहणी केली. टेम्पोमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ विमल पानमसाला, शुद्ध प्लस पानमसाला, व्ही -१ तंबाखू, नावी तंबाखू असा सुमारे १ कोटी ८ लाख ९७ हजार ५२० रूपयांचा साठा आणि वाहन (किंमत अंदाजे आठ लाख रुपये) ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थ मुंबईकडे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने टेम्पोचा चालक परमेश्वर संपत ढाकरगे, वाहनाचे मालक राजेश राजू शेटीया, राजकुमार सपाटे, शौकत अली पठाण आणि राजेश गुप्ता यांच्याविरूद्ध भारतीय दंड कलम 188, 272, 273, 328 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ चे कलम ५९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाचे वाहतूक केल्याप्रकरणी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहनचालकाचा वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन
अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या आदेशानुसार आणि अन्न व औषध आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या सूचनेनुसार, सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने १ एप्रिल २०२२ ते २१ नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंत कोकण विभागातील
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील १७३ आस्थापनांची तपासणी केली असता १४२ ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा एक कोटी ७२ लाख ७ हजार ४८६ रुपयांचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला. संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व संबंधितांविरुद्ध ५८ गुन्हे (एफ आय आर) नोंदवण्यात आलेले आहेत तर १२९ आस्थापना सील करून दोन वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत.
तसेच १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील एकूण १०५ आस्थापनांची तपासणी केली असता ९९ ठिकाणी ४ कोटी ५३ लाख १४ हजार ६१८ रुपये एवढ्या किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा ताब्यात घेतला. याप्रकरणी संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये ५२ गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. तर ८६ आस्थापना सील करून २० वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत. सदर प्रकरणी एकूण ३१ खटले न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत. कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री होत
असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी. यासह प्रतिबंधित अन्नपदार्थाचे मानवी शरीरावर होणारे अत्यंत घातक परिणाम/ दुष्परिणाम विचारात घेता या अन्नपदार्थांचे सेवन न करण्याबाबत तसेच अन्नपदार्थाच्या सेवनाच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन ठाण्याचे सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.