मुक्तपीठ टीम
दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून संपूर्ण देशातील वातावरण तापले आहे. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. तर आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू करण्यात आली असून विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. शेतकरी आंदोलन हाताळण्यावरुन विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रावर निशाणा साधला आहे.
“जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याला देशद्रोही ठरवले जाते”, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली आहे. हे असं कसं असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आहे. पद्म पुरस्कार विजेते पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनावर लिहिणारे पत्रकार मनजीत सिंह आणि अशा अनेक लेखक, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे संजय राऊत यांनी सदनात म्हटले.
तसेच “ट्रॅक्टर रॅली दरम्यान राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी असल्याचे सांगताना दिप सिद्धूला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही? ते केले नाही पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केली आहे”, असे म्हणत राऊतांनी सरकारला टोला लगावला आहे.