मुक्तपीठ टीम
कृषी कायद्यांच्या निमित्ताने मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान आताही राज्यपाल मलिक यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना लढण्यापूर्वी प्रश्न समजून घेण्याचे सांगितले. तसेच त्यांनी आधी सत्ता बदला, मग एक होऊन स्वत:चे सरकार बनवा असे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. रविवारी हरियाणातील जिंदमधील कंडेला गावात कंडेला खाप आणि माजरा खाप यांनी आयोजित केलेल्या किसान सन्मान सोहळ्याला राज्यपाल मलिक यांनी संबोधित केले.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी स्वत:ला मजबूत बनवावे, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वतःचा झेंडा फडकवाल. त्यांना खापोंकडून पगडी आणि बंधुभावाचे उदाहरण असलेला हुक्का देण्यात आला. खापोंनी दिलेला किसान सन्मान रत्न मिळाल्यानंतर त्यांनी तो शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना परत केला.
ते म्हणाले की, दिल्लीतील ऊन, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता शेतकरी वर्षभराहून अधिक काळ रस्त्यावर उतरले. खापे हेच आमची ताकद असल्याचे ते म्हणाले. जेव्हा जेव्हा खापोंची गरज असेल तेव्हा ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील. मुलींना शिक्षित करा आणि हुंडा प्रथा बंद करा, असे आवाहन त्यांनी केले.