मुक्तपीठ टीम
नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलकांनी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलकांच्या निर्णयावर दिल्ली पोलीसांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही दिल्ली पोलीसांची जबाबदारी असल्याचे सांगत कोणतेही आदेश देण्यास नकार दिला आहे.
“नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी आयोजीत केलेल्या ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे अयोग्य आहे. हा पोलिसांचा मुद्दा आहे. पोलीस याप्रकरणी निर्णय घेतील. आम्ही कोणताही आदेश देणार नाही,” असे सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनी मोर्चा न काढण्याचे आदेश शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला ही याचिका मागे घेण्यास सांगितली असून दिल्ली पोलिसांना निर्णय घेण्यास सांगितला आहे. तसेच देशाच्या राजधानीत कोणाला प्रवेश द्यायचा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रथम दिल्ली पोलिसांना असल्याचे पुढे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.