मुक्तपीठ टीम
ऊसासाठी एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा असूनही तो दोन तुकड्यात देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध वाढतो आहे. आता तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा ggसंघात काँग्रेसच्या वतीने लढणाऱ्या आघाडीच्या उमेदवाराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या आधीच शिवसैनिकांमध्येही नाराजी असल्याचं उघड झाले आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी?
- ऊसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात करून घेतला आहे.
- त्यावर पुर्नविचार करण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, साखर आयुक्त तसेच संबंधित खात्याचे सचिव यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.
- राज्य सरकारला एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा अधिकार नसल्याने ती एकरकमी देण्याची मागणी केली होती.
- सहकार विभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार यांनी पत्राद्वारे कारखान्यांच्या बाजूनेच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत एफआरपी दोन टप्प्यातच दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.
- राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे.
- यात शेतकर्यांचा तोटा होणार नसल्याने तो कदापी बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एफआरपी एकरकमी वसूल केल्याशिवाय सोडणार नाही!
- शेतकर्यांना विश्वासात न घेता साखर कारखानदारांच्या दबावापोटी हा निर्णय घेतला आहे.
- मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या या निर्णयाविरूध्द मी याचिका दाखल केली आहे.
- एफआरपी एकरकमी वसूल केल्याशिवाय सोडणार नाही.
- रस्त्यावरील संघर्ष अटळ असून याचे गंभीर परिणाम आघाडी सरकारला भोगावे लागतील.
कोल्हापुरातील लढाई आता नाही सोपी!
- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
- महाविकास आघाडीकडून काँग्रेसची उमेदवारी दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना देण्यात येणार आहे.
- मात्र असं असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत पाच वेळा निवडून आलेल्या शिवसेनेचा हक्क डावलला जात
- असल्याच्या भावनेतून स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
- मात्र,स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमधील नाराजी कायमच असल्याचे सांगण्यात येत आहे.
- शिवसैनिकांच्या या नाराजीचा फटका तीन विरुद्ध एक समीकरणाच्या बळावरच्या आघाडीच्या निवडणूक रणनीतीला बसण्याची शक्यता आहे.
- त्यात पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमकतेनेही वजाबाकी ठरलेली मानली जाते.