मुक्तपीठ टीम
अखेर ज्याची भीती होते तेच दिल्लीत घडू लागले आहे. जे घडू नये तेच घडत आहे. बिघडत आहे. गेले दोन महिने दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत, काहीवेळा पावसाचा माराही सहन करत आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांपैकी काहींचा संयम आज संपला. पोलिसांनी उभारलेले अडथळे झुगारून बरेच शेतकरी दिल्लीत घुसले आहेत. अनेक ठिकाणी दगडफेक, लाठीफेक आणि पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा झाला आहे. शेतकरी त्यांच्या नेत्यांनाही जुमानत नसल्याचे आताचे चित्र आहे.
प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर संचलनाचे आयोजन केले आहे. दुपारी १२नंतर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलन सुरु होणार होते. पण अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्ली सीमांवर पोहचले. वेळेआधीच सिंघु आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या काही शेतकरी आंदोलकांनी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सना तोडून दिल्लीत प्रवेश केला. यानंतर हे शेतकरी बराच काळ मुकरबा चौकात बसले परंतु त्यानंतर त्यांनी तेथे लावलेले बॅरिकेड्स आणि सिमेंट ब्लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. काही उचलून फेकण्यातही आले.
ठरलं होतं तसं नाही झालं, नेमकं कसं अपेक्षित होतं…क्लिक करा आणि वाचा
शेतकरी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी अश्रूधुंरांच्या गोळ्यांचा मारा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपथ येथे सुरू असलेली प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्याची परवानगी दिली असल्याचे सतत आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही बरेच शेतकरी ट्रॅक्टरसह वाट्टेल त्या रस्त्यांवर वेगाने जाताना दिसून आले. अनेक ट्रॅक्टर्सवर तिरंगा झेंडे लावलेले आहेत. तसेच पुरुष आणि महिला ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहेत. काही आंदोलक विविध झेंडे हातात घेऊन चालत असल्याचेही दिसले.