मुक्तपीठ टीम
शेतीला दिवसा वीज मिळावी आणि वीज तोडणी थांबवावी, या मागण्यांसाठी राज्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी झाली होती. शेतीला दिवसा वीज मिळावी आणि वीज तोडणी थांबवावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार…
- या चक्काजाम आंदोलनाला कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
- महावितरणचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, राजू शेट्टी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी राजू शेट्टी यांचे सुपुत्रही या आंदोलनात सहभागी झाले होते. - आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
- जिल्ह्यातील कुरुंदवाड आणि शिरोळ तालुक्यातील उदगाव टोलनाक्याजवळही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून महावितरण व सरकारचा निषेध केला आहे.
- जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
यासाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांचं आंदोलन
- शेतीला दिवसा वीज मिळावी या मुख्य मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कोल्हापूरच्या महावितरणच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे.
- शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याचा निर्णय झाला नाही, तर ४ मार्चपासून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता.
- यापूर्वी दोन मंत्री, दोन आमदारांनी आंदोलनाला भेट दिली होती. मात्र, शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही.
- यापुढे मंत्री, आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार, असाही इशाराही राजू शेट्टी यांनी यापूर्वी दिला होता.
- ऊर्जामंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन.